केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात जिल्ह्य़ाची कामगिरी सर्वसाधारणच

पालघर : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास विभागातर्फे करण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’अंतर्गत पालघर जिल्ह्य़ातील नगर परिषद व नगर पंचायतीची कामगिरी सर्वसाधारण राहिली आहे. वसई-विरार महानगरपालिकेने त्यांची कामगिरी उंचावली आहे. त्याचबरोबरीने डहाणू, जव्हार, विक्रमगड, मोखाडा व तलासरी या नगर परिषद- नगर पंचायतीची कामगिरीदेखील काही प्रमाणात सुधारली आहे. मात्र पालघर नगर परिषदेने आपल्या विभागात अखेरचा क्रमांक पटकावला आहे.

एप्रिल ते डिसेंबर २०१९ दरम्यान तीन तिमाही सर्वेक्षणांमध्ये संपन्न झालेल्या स्वच्छता सर्वेक्षण लीग २०२० चे निकाल जाहीर झाले आहेत. या सर्वेक्षणात घरगुती कचरा गोळा करून त्याची विगतवारी करणे, कचरा विल्हेवाट केंद्रापर्यंत वाहतुकीची सुविधा करणे, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सुविधा करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करणे व पुनर्वापर करणे, कचरा कमी करण्यासाठी पुनर्वापराच्या सुविधा निर्माण करणे, घनकचऱ्यामधून निर्मिती होणारे वायू प्रदूषण रोखणे, कचरा वेचणाऱ्या महिलांचे जीवनमान उंचावणे तसेच घरोघरी निर्मित होणारा कचरा उचलणे व त्याचे प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करणे इत्यादी मुद्दय़ांवर या सर्वेक्षणादरम्यान मूल्यांकन केले जाते.

दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये वसई-विरार महानगरपालिकेने ३२ वा क्रमांक पटकावला आहे. सन २०१९ (३६ क्रमांक) व  २०१८ (६१ क्रमांक) मधील कामगिरी महानगरपालिकेने सुधारली आहे. ५० हजार ते एक लाख लोकसंख्या गटांमध्ये डहाणू नगर परिषदेने ५८ वा क्रमांक पटकावला आहे. डहाणू नगर परिषद २०१९ मध्ये ८६, तर २०१८ मध्ये १०३ क्रमांकावर राहिले होते. मात्र याच विभागांमध्ये पालघर नगर परिषद १०४ वा क्रमांक पटकावून राज्यातील या विभागातील ४८ नगरपरिषदमध्ये अखेरच्या क्रमांकावर राहिली आहे. २०१९ मध्ये पालघर ११६ व्या क्रमांकावर, तर २०१८ मध्ये ९४ क्रमांकावर राहिली होती. २५ हजारांच्या लोकसंख्ये पर्यंतच्या नगर परिषद- नगर पंचायती विभागामध्ये जव्हार नगर परिषदेने ३४ व्या क्रमांकावर मानांकन मिळविले असून विक्रमगड १९०, मोखाडा ३१६, तर तलासरी ३४९ क्रमांकावर राहिली आहे. या सर्व शहरांनी गेल्या वर्षभरातील कामगिरीमध्ये मोठय़ा प्रमाणात सुधारणा केली आहे.

फलकबाजीत लाखांचे खर्च वाया

स्वच्छता अभियानअंतर्गत सर्वेक्षणासाठी समिती येण्याच्या पार्श्वभूमीवर पालघर नगर परिषदेमध्ये नागरिकांमध्ये जनजागृतीच्या नावाखाली अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात बॅनरबाजी केल्याचे दिसून आले. यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जात असून यानिमित्ताने करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी पुढे आल्या आहेत. पालघर शहरातील कचरा ठेक्यामध्ये ओला व सुका कचऱ्यांचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याचे स्पष्टपणे नमूद असताना कचऱ्याचे कोणत्याही प्रकारे वर्गीकरण केले जात नाही. मोरेकुरण गावाजवळ असलेल्या खारेल पाडय़ाजवळ शहरातून गोळा होणारा कचरा एकत्रित ढीग लावून गोळा केला जातो. शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगर परिषद स्थापनेला २२ वर्षे झाल्यानंतरदेखील कोणतीही ठोस उपाययोजना हाती घेण्यात आली नाही. कचऱ्याच्या पुनर्वापरासाठी तसेच प्लास्टिकबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी विशेष उपाययोजना हाती घेतल्या नसल्याचे दिसून आले आहे.