|| नीरज राऊत

पालघर जिल्ह्यात ४४ खासगी रुग्णालयांना परवानगी; सुरू करण्याच्या घाईमुळे नियमांकडे डोळेझाक

पालघर : पालघर जिल्ह्यातील करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरकारी यंत्रणा अपुरी पडू लागल्याने जिल्ह्यातील ४४ हून अधिक खासगी रुग्णालयांना उपचारांची परवानगी देण्यात आली. रुग्णांवर तातडीने उपचारासाठी परवानग्या देताना सुरक्षेविषयीचे नियम, संकेत या गोष्टींकडे प्रशासनाला डोळेझाक करावी लागत आहे. मात्र, अशा प्रकारची तडजोड किती धोकादायक ठरू शकते, हे विरारमधील दुर्घटनेने दाखवून दिले आहे.

जिल्हा प्रशासनाकडे करोना रुग्णांवर उपचार करण्याच्या मर्यादा असताना शासकीय व्यवस्था वाढवणे शक्य नसल्याने जिल्ह्यातील ४४ खासगी रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी देण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी सुमारे ३५ रुग्णालये वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील असून या रुग्णालयांत सुमारे दीड हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.

करोना उपचारासाठी एखाद्या रुग्णालयाला परवानगी देण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सकाने तेथे जाऊन पाहणी करणे आवश्यक असून करोना रुग्णालयाकरिता शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वे व अटींची पूर्तता रुग्णालयाने करणे आवश्यक असते. मात्र, सध्या जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना प्रत्येक वेळी ही प्रक्रिया पार पाडणे शक्य होत नाही. अशा तडजोडीमुळेच रुग्णालयांत दुर्घटना होत असल्याचे आरोप होत आहेत.

प्रत्येक समर्पित करोना रुग्णालयात पूर्णवेळ वैद्यकीय तज्ज्ञ असणे बंधनकारक असताना काही रुग्णालयांनी कन्सल्टिंग वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने ४० ते ६० खाटांची रुग्णालये कार्यरत ठेवली असल्याचे समोर येत आहे. रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेसंदर्भात आवश्यक धूरशोधक, अग्निशोधक यंत्रणा, अग्निशामक यंत्रणा, अलार्म यंत्रणा, अग्निशामक स्प्रिंकलर असणे आवश्यक असताना, त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. करोना रुग्णांच्या उपचारादरम्यान दोन खाटांमध्ये अंतर ठेवण्याचे आयसीएमआरने नमूद केले असताना रुग्णक्षमता वाढवण्याचा प्रयत्न अनेक रुग्णालयांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगण्यात येते.

पूर्वी मर्यादित खाटांच्या क्षमतेने सुरू केलेल्या रुग्णालयांमध्ये असलेल्या कमी उपयोगातील खोल्यांचे स्पेशल रूममध्ये परिवर्तन करून किंवा सामान साठवण्यासाठी असलेल्या जागा रिकामी करून रुग्णसेवेकरिता वापरताना परवानगी पूर्व पाहणीमध्ये दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. अशी डोळेझाक केल्यानेच विरारमधील दुर्घटना घडल्याचा आरोप होत आहे.

शल्य चिकित्सक विभागात मनुष्यबळाची कमतरता

पालघर जिल्ह्याच्या शल्य चिकित्सक विभागाकडे १२ पदे मंजूर असून सद्य:स्थितीत शल्य चिकित्सक यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक, सहा अधीक्षक,  कनिष्ठ लिपिक, फार्मासिस्ट व सांकेतिक अधिकारी ही पदे सध्या भरली गेली आहेत. पालघरमधील इतर पदांकरिता जिल्ह्यात इतर ठिकाणी कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. पालघरचे शल्य चिकित्स डॉ. अनिल थोरात आजारी असल्याने त्या पदाचा प्रभारी कार्यभार डॉ. राजेंद्र केळकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ५० लाखांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मुंबई लगतच्या जिल्ह्यात आरोग्य विभागामधील महत्त्वाची पद्धे रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

विजयवल्लभ रुग्णालय दुर्घटनेतील १४ मृतांची नावे

१) उमा सुरेश कनगुटकर, (स्त्री/ ६३)

२)  निलेश भोईर  (पु./३५)

३)  पृथ्वीराज वल्लभदास वैष्णव (पु./६८)

४)  रजनी कडू, (स्त्री / ६०)

५) नरेंद्र शंकर शिंदे (पु./ ५८)

६)  जनार्दन मोरेश्वार म्हात्रे (पु./ ६३)

७)  कुमार किशोर दोशी (पु./ ४५)

८) रमेश उपयान (पु./५५)

९)  प्रवीण शिवलाल गौडा (पु./ ६५)

१०)  अमेय राजेश राऊत (पु./ २३)

११)  शमा अरुण म्हात्रे (स्त्री/ ४८)

१२)  सुवर्णा पितळे (स्त्री/ ६४)

१३)  सुप्रिया देशमुख (स्त्री/ ४३)

१४)  शिवाजी पांडुरंग विलकर (पु./ ५६)