]नगर : जिल्ह्यचा करोना संसर्गाचा दर १० टक्केपेक्षा कमी असला तरी एकूण प्राणवायू खाटावर ४० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णसंख्या असल्यामुळे जिल्ह्यतील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र या  सुधारित आदेशाचा फायदा नगर शहराला झाला आहे. त्यामुळे नगर शहरासह जिल्ह्यतील किराणा दुकाने, बाजार समिती, अंडी—मटण—मासे विक्री व भाजीपाला (केवळ द्वारसेवा), कृषीसेवा दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेत उद्या, मंगळवारपासून व्यवसायिकांना सुरू ठेवता येणार आहेत. बेकरी व मिठाईची दुकाने बंदच राहतील. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यासंदर्भातील आदेश आज, सोमवारी काढले.

राज्य सरकारने काल, रविवारी या संदर्भातील आदेश दिले होते. त्यानुसार ज्या जिल्ह्यतील करोना संसर्गाचा दर १० टक्कय़ांपेक्षा कमी व एकूण प्राणवायू खाटांवरील रुग्णसंख्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे तेथे निर्बंध कायम ठेवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

जिल्ह्यचा संसर्गाचा दर १० टक्कय़ांपेक्षा कमी असला तरी प्राणवायू खाटावरील रुग्णसंख्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यतील निर्बंध कायम राहिले आहेत. परंतु यापूर्वी महापालिका आयुक्तांनी नगर शहरातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे किराणा दुकाने,  भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. आता सुधारित आदेशामुळे संपूर्ण जिल्ह्यसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एकच आदेश जारी केला आहे. तशा सूचना राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. केवळ ज्या शहरांची लोकसंख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे तेथेच मनपा आयुक्तांना स्वतंत्र आदेश काढण्याची परवानगी देण्यात आली होती.  या पार्श्वभूमी वर नगर शहरासाठी मनपा आयुक्तांनी दिलेले आदेश रद्द झाले आहेत. यापूर्वी नगर शहर वगळता उर्वरित जिल्ह्यत किराणा दुकाने भाजीपाला विक्री सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू होती.

सुधारित आदेशानुसार किराणा दुकान, दूध व दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला व फळे (केवळ द्वार विक्री), बाजार समिती, अंडी—मटण—मासे, कृषीसेवा दुकाने, पशुखाद्य दुकाने, सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू ठेवता येणार आहेत. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना केवळ घरपोच पार्सल व्यवस्था सुरू ठेवता येईल.

ल्ल टॅक्सी, कॅब केवळ अत्यावश्यक सेवेसाठी वापरता येईल. खासगी कार्यालय पूर्ण बंद राहतील. ज्या सरकारी कार्यालयातून करोना संसर्ग प्रतिबंधाचे व्यवस्थापन केले जाते, अशी कार्यालये वगळून उर्वरित ठिकाणी १५ टक्के कर्मचारी परवानगी देण्यात आली आहे. कटिंग, सलून, स्पा बंद राहतील. शिक्षण संस्था, शिकवणी वर्ग, मैदाने बंद राहतील. विवाहांना बंदी आहे. बांधकामेही बंद राहतील. चहा टपरी बंद राहील.