इचलकरंजी शहरातील शुद्ध पेयजल प्रकल्पप्रश्नी मंगळवारी आयोजित केलेल्या जनता दरबारात  नगरपालिकेतील सत्तारुढ काँग्रेस, विरोधी शहर विकास आघाडी तसेच उपस्थित असणारे नागरिक एकाचवेळी उठून मोठमोठय़ाने बोलू लागल्याने गोंधळ उडाला. अशा वातावरणात  जनता दरबार गुंडाळण्यात आला. शहरातील शुद्ध पेयजल प्रकल्प हे नगरपालिकेच्याच मालकीचे असून ते अन्यत्र स्थलांतर अथवा बंद करण्यात येणार नाहीत. पालिकेची हे प्रकल्प चालविण्याची तयारी असेल तर आमची कसलीही हरकत असणार नाही, अशी माहिती नवमहाराष्ट्र सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष राहुल आवाडे यांनी दिली.
इचलकरंजी शहरामध्ये दोन वर्षांपूर्वी उद्भवलेल्या काविळी साथीत ३० हून अधिक लोक दगावले होते. या पाश्र्वभूमीवर कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक, नवमहाराष्ट्र सहकारी सूत गिरणी, इचलकरंजी को-ऑप. स्पििनग मिल्स् या संस्थांनी नऊ ठिकाणी शुध्द पेयजल प्रकल्प उभारले आहेत. गत काही दिवसांपासून या प्रकल्पावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. नवमहाराष्ट्र सूतगिरणीने उभारलेल्या तीन शुद्ध पेयजल प्रकल्पांबाबत सामाजिक कार्यकत्रे दिलीप माणगावकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागविली. त्यातील तक्रारीचा सूर पाहता आवाडे यांनी, आपण जनहिताचेच काम करीत असताना नाहक बदनामी केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करून १ जुलपासून शुद्ध पेयजल प्रकल्प बंद करुन ते अन्यत्र हलविणार असल्याचे निवेदन नगरपालिकेस दिले. त्यावर शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी, नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणे हे जनहिताचे आहे, असे सांगत शुद्ध पेयजल प्रकल्प हे सुरुवातीपासूनच नगरपालिकेच्या मालकीचे आहेत, ते अन्यत्र हलविता येणार नाहीत, अशी हरकत घेतली होती. यामुळे या शुध्द पेयजल संदर्भात निर्णय करण्यासाठी नगराध्यक्षा  बिस्मिला मुजावर यांनी मंगळवारी जनता दरबार बोलविला होता.
मुख्याधिकाऱ्यांनी प्रकल्प उभारतेवेळी घातलेल्या अटीनुसार प्रकल्प पालिकेचे असून संबंधित संस्थांनी त्याचा हिशोब द्यावा आणि जमा झालेली रक्कम पालिकेकडे भरावी, अशी जाधव यांनी मागणी चच्रेच्या सुरवातीस केली. यानंतर आवाडे म्हणाले,की नवमहाराष्ट्र सूत गिरणीने उभ्या केलेल्या प्रकल्पांना अनुक्रमे ९ महिने, ६ महिने व ५ महिने झालेले आहेत. तिन्ही प्रकल्पांची मिळून ३ लाख ६० हजार रुपये रक्कम जमा झालेली आहे. तर देखभाल दुरुस्ती व सुरक्षा व्यवस्थेवर ४ लाख ६५ हजार रुपये खर्च झालेला आहे. पालिकेची इच्छा असेल तर प्रकल्प पालिकेकडे हस्तांतरित केले जातील किंवा नगरपालिकेने प्रस्ताव दिला तर पूर्वीप्रमाणे प्रकल्प चालविण्याची संस्थेची तयारी आहे.
 नगरसेवक महादेव गौड म्हणाले,की प्रकल्पावर बदनामीकारक फलक लावल्यामुळेच वाद निर्माण झाला आहे. त्याचा खुलासा आवाडे यांनी करावा. या मागणीला शिवसेना शहरप्रमुख धनाजी मोरे यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर नगरसेवक शशांक बावचकर म्हणाले, शुध्द पेयजल प्रकल्प संबंधित संस्थांनी चालवायचे किंवा नगरपालिकेच्या ताब्यात देऊन पालिकेने सुरु ठेवायचे याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा घेण्यात यावी.
अशी चर्चा सुरु असतानाच काँग्रेस व शहर विकास आघाडीचे नगरसेवक व काही नागरिक एकाचवेळी उभा राहून मोठमोठय़ाने बोलू लागले आणि गोंधळ उडाला. हा गोंधळ शांत करण्यासाठी दोन्ही बाजूच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी हस्तक्षेप केला. अखेरीस नगराध्यक्षा मुजावर यांनी बठकीतील निर्णय जाहीर केले आणि दरबार संपुष्टात आणला.