11 December 2017

News Flash

कीटकनाशक फवारणीतून विषबाधा जुलैपासूनच

बळींची संख्या वाढल्याने यंत्रणेला जाग

वार्ताहर, यवतमाळ | Updated: October 5, 2017 2:36 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

बळींची संख्या वाढल्याने यंत्रणेला जाग; आतापर्यंत १९ जण दगावले

कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकरी रुग्णालयात दाखल होण्यास जुलै महिन्यापासून सुरुवात झाली असताना त्यावेळी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी यंत्रणेने आता यामुळे वाढलेल्या बळींच्या संख्येनंतर धावपळ सुरू केली आहे. यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरल्याचे आता उघड झाले आहे.

कपाशी आणि सोयाबीनवर पडलेल्या अळीचा नायनाट करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या कीटकनाशक फवारणीमुळे १९ बळी गेले असले तरी प्रत्यक्षात फवारणीमुळे वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात जुल महिन्यातच उपचारासाठी दाखल झालेल्या शेतकऱ्यांची संख्या दोन, पाच, दहा, पंधरा होत होत चोवीसपर्यंत पोहोचली होती आणि ऑगस्टमध्ये हा आकडा शंभरी पार करत ११४ पर्यंत पोहोचला होता. धक्कादायक बाब ही की, सप्टेंबरच्या पूर्वार्धात २३१ शेतकरी-शेतमजूर वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झाले होते. जिल्ह्य़ात ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच जिल्ह्य़ाबाहेरही उपचारासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या आता ६५० च्या वर गेली आहे. सध्या राज्याचे कृषी आयुक्त असलेले सचिंद्र प्रताप सिंग हे ३० ऑगस्टपर्यंत यवतमाळचे जिल्हाधिकारी होते. १ सप्टेंबरला ते पुणे येथे कृषी आयुक्त म्हणून रुजू झाले. जिल्हाधिकारी म्हणून सचिंद्र प्रताप सिंग यांना ही बाब कळली नाही का? असा सवाल आता केला जात आहे.

यांचीही करा हकालपट्टी– विखे पाटील

या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी आणि याकडे दुर्लक्ष करणारे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना तातडीने निलंबित करावे, कीटकनाशक उत्पादक कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली आहे. उत्पादक कंपन्या आपली जबाबदारी झटकून शेतकऱ्यांवर ठपका ठेवत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.

जहाल कीटकनाशकावर बंदी

‘पोलीस’ या अतिजहाल कीटकनाशक उत्पादक कंपन्यांवर कारवाई करण्याचे आणि बंदी आणण्याचे आदेश देण्यात आले, असे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘पोलीस’ या कीटकनाशकात प्रोफिनोफॉस आणि टिमेडा क्रोप्रिडचे विषारी घटक असतात. ते ऊस पीक आणि उधळी नाशक म्हणून वापरले जातात. याशिवाय मोनोक्रोटोफॉस, प्रोफेनोफॉस, सुपर प्रोफेनोफॉस या कीटकनाशक उत्पादक कंपन्यांची चौकशी केली जाणार आहे, असे खोत यांनी सांगितले.

खोत यांच्यावर कीटकनाशक फवारणीचा प्रयत्न

यवतमाळ जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आज एका शेतकऱ्याने कीटकनाशक फवारणीचा अयशस्वी प्रयत्न केला. सिकंदर शहा असे या इसमाचे नाव आहे. तो शेतकरी वारकरी संघटनेचा अध्यक्ष आहे. आपला हेतू हा शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा होता, असे शहा यांनी सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. दरम्यान, खोत यांनी शहा यांच्यावर कोणतीही कारवाई करू नका, असे पोलिसांना सांगितले. आपल्या अंगावर थेंबभरही कीटकनाशक पडले नाही. शेतकऱ्यांची भावना समजू शकतो, असे ते म्हणाले.

नेते, अधिकाऱ्यांचे दौरे

कीटकनाशक फवारणीतून विषबाधेच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ निर्माण झाल्यावर केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री मदन येरावार, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खा. नाना पटोले, आ. बच्चू कडू व राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, वैद्यक शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग आदी नेते व अधिकाऱ्यांनी उपचार घेत असलेल्या शेतकऱ्यांच्या रुग्णालयात जाऊन भेटी घेतल्या. उशिरा का होईना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही दौरा केला.

अहिर यांचे पवारांवर खापर

कीटकनाशकांचे दर उत्पादन खर्चावर आधारित असावे, यासाठी आपण तातडीने उत्पादक कंपन्या आणि कृषी मंत्रालयाशी चर्चा करू, असे केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. कंपन्या उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी पटीने कीटकनाशक विकतात. किमती ठरवण्याचे अधिकार कृषी मंत्रालयाचे आहे. विरोधी पक्षात असताना उत्पादन खर्चावर आधारित किंमती असाव्यात, असा आग्रह धरला होता. मात्र, तत्कालीन कृषीमंत्री शरद पवार यांनी याला विरोध करत बाजारातील स्थिती लक्षात घेऊन किमती ठरवल्या. त्याचे हे सारे दुष्परिणाम आहे, असा आरोप हंसराज अहिर यांनी केला. उत्पादक कंपन्यांना वेसण घालणे जरुरीचे असून हा मुद्दा गुरुवारी, ५ ऑक्टोबरला सरकारसमोर ठेवणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. विषबाधेमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५ लाख रुपये मदत करावी, अशी मागणी करणारे पत्र अहिर यांनी २२ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यानंतर १० दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी दोन लाखांची मदत जाहीर केली हे येथे उल्लेखनीय.

वेळीच दखल घेतली असती तर..

२०१६ मध्ये १५, ऑगस्ट २०१६ मध्ये ३६ आणि सप्टेंबर २०१६ मध्ये ५८ शेतकरी फवारणीमुळे विषबाधित झाले होते. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला होता. २०१७ च्या जुलै महिन्यात २४, ऑगस्ट २०१७ मध्ये ११४ आणि सप्टेंबर २०१७ मध्ये २७४ शेतकरी विषबाधित होऊन रुग्णालयात दाखल झाले होते. पैकी १८ जणांचा मृत्यू झाला. वेळीच दखल घेतली असती तर असा हाहाकार उडाला नसता, असे खोत म्हणाले.

बळीराजा चेतना आणि शेतकरी मिशनचे पितळ उघडे

राज्यात यवतमाळ आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियान सुरू केले. दरवर्षी प्रत्येक जिल्ह्य़ाला ३२ कोटी रुपये मंजूर केले जातात, पण अतिशय फालतू कामांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते. शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढत असून बळीराजा चेतना अभियानाचे पितळ उघडे पडले आहे. वसंतराव नाईक स्वावलंबी शेतकरी मिशनही पांढरा हत्ती ठरल्याचे समोर आले आहे. वार्ताहर, यवतमाळ कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा होऊन शेतकरी रुग्णालयात दाखल होण्यास जुलै महिन्यापासून सुरुवात झाली असताना त्यावेळी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारी यंत्रणेने आता यामुळे वाढलेल्या बळींच्या संख्येनंतर धावपळ सुरू केली आहे. यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत ठरल्याचे आता उघड झाले आहे.

First Published on October 5, 2017 2:36 am

Web Title: pesticide poisoning from july in maharashtra