बचाव पक्षाचा दावा; शस्त्र तपासणी प्रयोगशाळेचा अहवाल नकारात्मक

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला संशयित सचिन अंदुरे याच्या मेहुण्याचा मित्र रोहित रेगेकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा बचाव पक्षाकडून शुक्रवारी न्यायालयात करण्यात आला. गुजरात शस्त्र तपासणी प्रयोगशाळेतील या पिस्तुलाबाबत दिलेला अहवाल (बॅलेस्टिक रिपोर्ट) नकारात्मक असल्याचे बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. धर्मराज चंदेल यांनी न्यायालयात सांगितले

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सय्यद यांच्या न्यायालयात सुरू आहे.

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित आरोपीने अंदुरेकडे पिस्तूल आणि तीन काडतुसे ठेवण्यासाठी दिली होती. अंदुरेने शस्त्रसाठा त्याचा मेहुणा शुभम सुरळेकडे दिला. दरम्यान, अंदुरेच्या अटकेचे वृत्त समजाताच शुभमने चुलतभावामार्फत पिस्तूल आणि काडतुसे त्याचा मित्र रोहित रेगेकडे ठेवण्यासाठी दिली, असा दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) करण्यात आला होता. ऑगस्ट महिन्यात जप्त करण्यात आलेले पिस्तूल सीबीआय गुजरातमधील शस्त्र तपासणी प्रयोगशाळेतील तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शस्त्रास्त्र तज्ज्ञांकडून याबाबत सीबीआयला अहवाल देण्यात आला आहे. हा अहवाल नकारात्मक असल्याचे अ‍ॅड. चंदेल यांनी न्यायालयात सांगितले.

दोषारोपपत्र सादर करण्यासाठी नव्वद दिवसांची मुदतवाढ देण्याचा अधिकार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांना नाही. याबाबत चेन्नई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे दाखले अ‍ॅड. चंदेल यांनी न्यायालयाला दिले. दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ हवी असल्यास.. तर तपास अद्याप पूर्ण का  करण्यात आला नाही?, सरकारी वकिलांचा अहवाल तसेच खटल्यातील मुद्दय़ांवर नेमका काय तपास झाला?, आरोपींना कारागृहात का ठेवायचे आहे?, या सर्व बाबींचा खुलासा सीबीआयने करणे गरजेचे आहे, असे अ‍ॅड. चंदेल आणि अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी सांगितले.

दरम्यान, बचाव पक्षाच्या युक्तिवाद खोडून काढताना सीबीआयचे वकील अ‍ॅड. पी. राजू म्हणाले, रेगेकडून जप्त करण्यात आलेला पिस्तुलाचा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात वापर केल्याचा दावा कधीच करण्यात आला नाही. गौरी लंकेश खून प्रकरणात अमोल काळेला अटक करण्यात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकरचे नाव पुढे आले.

सीबीआयने खुलासा करावा

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात अगदी सुरुवातीला इचलक रंजीतील मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलातून डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, या दाव्याचे पुढे काय झाले?, हे सीबीआयकडून अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. सनातनचे साधक डॉ. वीरेंद्र तावडे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रातील मुद्दे पुन्हा मांडण्यात आले आहेत. या मुद्दय़ांच्या आधारे दोषारोपपत्र दाखल करण्यास आणखी नव्वद दिवसांची मुदतवाढ मागण्यात आली आहे, असे बचाव पक्षाकडून न्यायालयात सांगण्यात आले.