रमेश पाटील

तीन वर्षांपासून काम नाही; एक कोटी रुपयांचा निधी वापराविना

वाडा तालुक्यातील कोने येथे क्रीडांगणासाठी राखीव असलेला शासकीय भूखंड अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. या भूखंडाची मोजणी करून महसूल विभागाने तीन वर्षांपूर्वी पालघरच्या जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे ताबा दिला. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा भूखंड धूळ खात पडून आहे. या भूखंडामध्ये काही स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.

क्रीडा संस्कृती जोपासली जावी, तिच्यात अधिक वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाचा क्रीडा विभाग क्रीडांगणांसाठी कोटय़वधी रुपये खर्च करत असतो. वाडा तालुक्यात मोठे क्रीडांगण तयार करण्यासाठी वाडय़ापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर कोने गावाजवळ १६ एकर १४ गुंठे भूखंड राखीव ठेवण्यात आला. तत्कालीन तहसीलदार डॉ. संदीप चव्हाण यांनी तीन वर्षांपूर्वी हा भूखंड जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे सुपूर्द केला. या क्रीडांगणासाठी एक कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. तीन वर्षांत प्रथमच क्रीडा विभागाने या निधीतील ७४ लाख रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला.

या निधीत संरक्षक भिंत, सपाटीकरण, बॅडमिंटन कोर्ट, सभागृह अशी प्राथमिक स्वरूपातील कामे करावीत, अशी अपेक्षा होती. मात्र हा निधी अल्प असून या निधीत संरक्षण भिंतीचेही काम पूर्ण होणार नाही, असे कारण बांधकाम विभागाने पुढे केल्याने हा निधी सहा महिन्यांपासून वापराविना पडून आहे. या भूखंडाच्या काही जागेवर स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले. प्रथम ही जागा पुन्हा मोजून तिचे सपाटीकरण करून संरक्षक भिंतीचे काम करून घ्यावे, अशी सामाजिक कार्यकर्ते डॉ. भाई वलटे यांनी सांगितले.

क्रीडांगणाच्या प्राथमिक स्वरूपाच्या कामांसाठी ७४ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केला आहे. उर्वरित कामांसाठी निधीचा पाठपुरावा सुरू आहे.

– शरद कलावत, जिल्हा क्रीडा अधिकारी, पालघर.

वाडा तालुक्यात एकही मोठे क्रीडांगण नाही. सर्व सोयीसुविधायुक्त असे क्रीडासंकुल झाले तर निश्चितच त्याचा फायदा वाडय़ासह विक्रमगड, शहापूर तालुक्यातील क्रीडापटूंना होईल.

-बी. के. पाटील, क्रीडा शिक्षक.

क्रीडांगणाची जागा विस्तीर्ण असल्याने त्यााठी मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. तसा प्रस्ताव पालघरच्या क्रीडा अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

-अरविंद कापडणीस, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.