ढगांच्या गडगडाटासारखा हास्यकल्लोळ, वाहवाच्या गगनभेदी हाळया, श्रोत्यांची गर्दी.. काव्यपीठावर विराजमान आंतरराष्ट्रीय प्रसिध्दीचे धनी प्रख्यात उर्दू शायर नयीम अख्तर खादमी, जय श्री राम सफर जोनपुरी, पुष्पा विरागणी, खुशबू, रमझान मुल्ला, अरविंद भोंडे, सुभेदार खॉन फौजी, नामवंत निवेदक अजीम नवाज राही व फटाकेदार अ‍ॅड. अनंत खेडकर यांच्या उपस्थितीत ज्ञान संजीवनी क्रीडा व बहुउद्देशीय संस्थेमार्फत आयोजीत कवी संमेलनात बुलढाणेकर श्रोते चिंब भिजले.
गेल्या २५ एप्रिलला सायंकाळी गर्दे हॉलमध्ये हे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते. मान्यवर कवींचा सत्कार प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, ज्ञान संजावनीचे सचिव चंद्रकांत काटकर, प्रा. स्वप्नील दांदडे, गजानन मुळे, गजानन मालठाने, विजय शिंदे, संध्या शिंदे, डॉ. कामिनी मामर्डे, विष्णुपंथ उबाळे, प्रा. कानडजे, संदीप तोटे, प्रा. विजय मोरे, प्रा. शशिकांत शिरसाठ आदींनी केला. याप्रसंगी आमदार विजयराज शिंदे यांच्या विकासात्मक कामगिरीचा ताळेबंद मांडणाऱ्या डॉ. एस.एम कानडजे यांनी संपादित केलेल्या विजयपर्व नामक विशेषंकाचे प्रकाशन आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शिंदे यांचा अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यानंतर अ‍ॅड. खेळकर यांच्या सूत्रसंचालनात कवी संमेलनाला सुरुवात झाली. अरविंद भोंडे यांनी विनोद किस्से सादर केल,े तर रमझाल मुल्ला यांनी मुलीच्या जन्माची चित्तरकथा विशद करणारी कविता सादर करताना श्रोत्यांच्या पापण्या आपसूकच ओलावल्या.
 तरक्कीयोकी दौड मे उसी का जोर चल गया बनाके अपना रास्ता जो भिड से निकल गया, या शेराने संपूर्ण जगात वारेमाप प्रसिध्दी मिळविलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शायर नईम अख्तर खादमी यांनी आपल्या गजल सादर केल्या. त्यांच्या गजलेतील प्रत्येक ओळ श्रोत्यांच्या कानातून मनात झिरपायला लागली होती.  रापलेला शास्त्रोक्त आवाज. आवाजाला वर्षांनुवर्षांच्या रियाजची जोड, अर्थगर्भ गजलांची चिरस्मरणीय मेजवानी बुलढाणेकर श्रोत्यांना अनुभवायला मिळाली. अख्तर यांनी सादर केलेल्या गजलांनी श्रोत्यांच्या मनाचा ताबा घेतला. आमदार शिंदे यांचा सर्वसमावेशक राजकीय आणि सामाजिक कारकीर्दीला समर्पित केलेल्या ओळी विशेष दाद घेऊन गेल्या
उसे हर रूख से परखा जा रहा है
मगर आईना हस्ता जा रहा है
तेरे चेहरे मे एैसा क्या है आखीर
जिसे बरसो से देखा जा रहा है
तब्बल चार तास चाललेल्या या कवी संमेलनाची उंची अ‍ॅड. खेळकर यांच्या निवेदन शैलीने वाढविली. अजिम नवाज राही यांच्या रसभरीत आभाराने या संमेलनाची सांगता झाली. कवी संमेलनाच्या आयोजनासाठी प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, चंद्रकांत काटकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.