रायगड जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या भरतीची लेखी परीक्षा रणरणत्या उन्हात पार पडली. उन्हाचे चटके सोसत राज्यभरातील विविध भागांतून आलेल्या पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागली. त्यामुळे लेखी परीक्षेच्या या नियोजनाबाबत उमेदवार आणि पालकांमध्ये नाराजीचा सूर होता.
रायगड पोलिस दलात ९५पदांसाठी सध्या पोलीस भरती सुरू आहे. पोलिस शिपाई भरतीकरिता ८ हजार ११२ उमेदवारांनी अर्ज केले होते. यात १२८२ महिला आणि १०९ जणांनी बॅण्डपथकासाठी अर्ज सादर केला होता. २९ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान शारीरिक चाचणी आणि कागदपत्र तपासणी पार पडली. या चाचणीत १ हजार ७८८ उमेदवार पात्र ठरले. यात १ हजार ५७६ पुरुष, २०१ महिला आणि ११ बँण्ड्समनचा समावेश होता. या सर्व पात्र उमेदवारांची आज पोलीस मुख्यालयात पोलीस परेड मदानात लेखी परीक्षा पार पडली.
मुलांना सकाळी सहा वाजता हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष परीक्षा पावणेबाराला सुमारास सुरू झाली. तर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी पूर्ण झाली. उमेदवारांची कागदपत्र पडताळणी तसेच कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी केलेली शारीरिक तपासणी यामुळे हा विलंब होत गेला. त्यानंतर रणरणत्या उन्हात पात्र महिला आणि पुरुष उमेदवारांना लेखी परीक्षा देण्यास बसवण्यात आले. दुपारी बाराच्या उन्हात चटके सोसत मुलांना परीक्षा द्यावी लागली.
राज्यभरात उन्हाचा पारा आता चढायला लागला आहे. तळपत्या सूर्यामुळे उष्माघाताचे प्रकार सुरू झाले आहेत. अशा वेळी रायगड पोलीसांनी केलेल्या लेखी परीक्षेच्या नियोजनाबाबत उमेदवार आणि त्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली. वास्तविक पाहता अलिबागमधील बहुतांश शाळांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागल्या आहेत. अशा वेळी पोलिसांना लेखी परीक्षांसाठी शाळा विनामोबदला मिळण्यास काहीच हरकत नव्हती. मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते योग्य राहिले असते.
मात्र सुरक्षेचे कारण पुढे करीत रायगड पोलिसांनी भर उन्हात मुलांना बसवून परीक्षा घेण्याचा घाट घातला. लेखी परीक्षेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. पाच उपविभागीय पोलीस अधिकारी १५ पोलीस निरीक्षक आणि ३५० कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र भर उन्हाळ्यात १२ च्या सुमारास परीक्षा घेणे मुलांचे आरोग्य आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही याचा विसर पोलिसांना पडला.
परीक्षेत पारदर्शकता असावी आणि अनुचित प्रकार टाळावेत यासाठी ही लेखी परीक्षा उघडय़ा मदानात घेण्यात आली. त्यामुळे नियंत्रण करणे सोपे गेले. मुलांना पाणी प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. शाळेच्या वर्गामध्ये परीक्षा घेतली असती तर आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरा बसवता आले नसते. असे अरिवद पाटील, जनसंपर्क अधिकारी, रायगड पोलीस यांनी सांगितले.