राज्य पोलीस दलातील महानिरीक्षक विठ्ठल जाधव, नव्या दमाचे परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी पंकज देशमुख यांच्यासह अन्य दोन अधिकाऱ्यांविरुद्ध येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास ढोले यांनी केलेला अब्रुनुकसानीचा दावा स्थानिक न्यायालयाने अलीकडेच दाखल करून घेतला. या चौघांकडून मानहानीबद्दल ढोले यांनी ४ कोटी रुपये भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
यातील जाधव हे दोन वर्षांपूर्वी नांदेडचे पोलीस अधीक्षक होते. आता ते मुंबईत आहेत. पंकज देशमुख हे येथे पोलीस उपअधीक्षक (गृह) पदावर कार्यरत असून त्यांच्यासोबत अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले तसेच लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित असलेले फौजदार राहुल तायडे यांनाही ढोले यांनी न्यायालयात खेचले. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा दावा दाखल करून घेताना वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीशांनी चारही प्रतिवादींवर नोटिसा बजावत येत्या ८ जुलै रोजी त्यांना न्यायालयापुढे हजर राहण्याचा आदेश जारी केला आहे.
सन २०१३ च्या अखेरीस देशमुख व ढोले यांच्यात एका बैठकीत वाद निर्माण झाला. ढोले तेव्हा स्थानिक गुन्हा शाखेत निरीक्षक होते. आपल्याकडे असलेला अर्धन्यायिक अधिकाराची जाणीव त्यांनी आयपीएस देशमुख यांना करून दिल्यानंतर त्यावेळी इतवारा उपविभाग प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या देशमुखांनी पुढे ढोले यांना अडचणीत आणले. ढोले यांनी एका फरार आरोपीची जमीन आपल्या पत्नीच्या नावावर खरेदी केल्याचे तसेच अन्य एका आरोपीला त्यांनी आश्रय दिल्याची नेपथ्यरचना करून खळबळ माजविण्यात आली. मुलाखतीच्या माध्यमातून ढोले यांना खलनायक ठरविले गेले. या प्रकरणात पुढे जाधव व चिखले यांनी देशमुख यांना साथ देत ढोले यांचे निलंबन केले; पण पुढच्या टप्प्यावर त्यांच्या या कारवाया गुणवत्तेच्या कसोटीला उतरल्या नाहीत.
 या सगळ्या पाश्र्वभूमीवर पोलीस निरीक्षक ढोले यांनी १ ऑक्टोबर २०१४ रोजी राज्याचे अप्पर मुख्य सचिव (गृह) यांना सविस्तर निवेदन पाठविले. पंकज देशमुख यांनी केलेले कटकारस्थान तसेच त्यांना विठ्ठल जाधव व चिखले यांनी दिलेली प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ या सर्व बाबींचा ऊहापोह ढोले यांनी या निवेदनात केला. आपल्यावर दोष ठेवण्यासाठी देशमुख यांनी किती उत्साह दाखविला, याची नोंद उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली. याकडेही ढोले यांनी लक्ष वेधले. विठ्ठल पुयड या आरोपीला ढोले यांनी आश्रय दिल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. परंतु पुयड यांनी नंतर उच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्दबातल झाला. देशमुखांच्या या रचित कारवायांमुळे आपली व आपल्या कुटुंबीयांची जनमानसात बदनामी झाल्याने, संबंधितांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची परवानगी ढोले यांनी याच निवेदनात मागितली होती. त्यांना परवानगी मिळाली नाही किंवा नाकारली गेलीही नाही; पण सर्वोच्च न्यायालयाच्या एका निवाडय़ाचा आधार घेत ढोले यांनी दोन आयपीएस अधिकाऱ्यांसह अन्य दोघांना न्यायालयात खेचल्याने खळबळ माजली आहे.
या कायदेशीर लढाईत ढोले यांनी आवश्यक ते दस्ताऐवज, पुरावे, देशमुखांच्या मुलाखतींच्या ध्वनिचित्रफिती, आवश्यक त्या नोंदी असे सारे काही जमा करून महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला (३० एप्रिल) वरील चौघांना जबरदस्त ‘सलामी’ दिली. तत्पूर्वी त्यांनी वकिलांमार्फत चौघांनाही नोटीस पाठविली होती; पण या नोटिशीला त्यांनी उत्तर न दिल्याने जास्तीत-जास्त कोर्ट फी तीन लाख भरून त्यांनी चौघांवर चार कोटींचा दावा दाखल केला. अशा स्वरूपाचा दावा दाखल होण्याची नांदेडमधील ही पहिली घटना संबंधितात चर्चेचा विषय बनली आहे.