पंढरपूर तालुक्यातील आनवली गावामध्ये मोटारीतून गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या दोन डॉक्टरांसह एकूण सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना सोलापूर जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रकरणामागे गर्भलिंग निदान करणारे मोठे रॅकेट असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
पंढरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनवली गावामध्ये मोटारीमधून गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याची माहिती सोमवारी संध्याकाळी पोलिसांना मिळाली. त्यानंतर लगेचच पोलीस पथकाने घटनास्थळी धाड घालत दोन डॉक्टर, त्यांचे दोन सहायक आणि तीन महिला अशा सात जणांना ताब्यात घेतले. गर्भलिंग निदान करणाऱ्या टोळीतील मुख्य डॉक्टरला याबद्दल माहिती मिळाल्यावर तो पळून गेला. तो मूळचा विजापूरचा असल्याचे समजते. ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींनी आपण गर्भलिंग निदान चाचणी करीत असल्याची कबुली पोलिसांपुढे दिली आहे. गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार सर्व आरोपींना जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घटनास्थळावरून लॅपटॉप, सोनोग्राफीचे यंत्र आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दहा ते बारा हजार रुपये घेऊन गर्भलिंग निदान केले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पंढरपूर पोलिसांनी एक पथक तयार केले असून, त्याच्याकडून शोधमोहिम सुरू आहे. पंढरपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.