पोलीस ठाण्यामार्फत निष्पक्ष तपास करावा व पारदर्शी कारभार करावा, अशी अपेक्षा नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी व्यक्त केली. जिल्ह्य़ात त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मंगळवारी दुपारी त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारताना दिले.
मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. या वेळी मावळते अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते. कोणत्याही घटनेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी अशीच आपली सूचना आहे, असे स्पष्ट करताना त्रिपाठी यांनी गुन्ह्य़ांना आळा घालणे, कायदा व सुव्यवस्था राखणे यासाठी आपले प्राधान्य राहील, असेही सांगितले. ते म्हणाले, यासाठी आपल्याला लोकप्रतिनिधींसह जनता, पोलीस अशा सर्वांचेच सहकार्य मिळेल. लोकप्रतिनिधी हे लोकांच्याच भावना व्यक्त करत असतात, त्यामुळे त्यांचे ऐकणे, परंतु कायद्याप्रमाणे उचित कारवाई करणे, असेच काम करावे लागेल. लखमी गौतम यांनी जिल्ह्य़ात चांगले काम केले, सूत्रे स्वीकारताना त्यांनी जिल्हा चांगल्या अवस्थेत आपल्याकडे दिला, ते काम आपण पुढे सुरु ठेवू, असेही त्रिपाठी म्हणाले.
मावळते अधीक्षक लखमी गौतम म्हणाले, जिल्ह्य़ातील कारकीर्दीबद्दल आपण पूर्णत: नाही तरी ८० टक्के समाधानी आहोत. तुम्ही सरळ काम केले तर इतर कोणाला फारसा हस्तक्षेप करण्याची संधी राहात नाही. याच भूमिकेतून काम केले. दरोडे, घरफोडय़ा यावर पोलिसांचा वचक निर्माण करण्याची संधी आपण निर्माण केली. फरारी असलेले सुमारे २५० गुन्हेगार पकडणे त्यामुळे शक्य झाले. काम करताना मला स्वत:ला हीरो व्हायचे नव्हते तर पोलिसांनी हीरो व्हावे, यासाठीच आपले प्रयत्न होते. त्यादृष्टीने पोलिसांना ‘अॅक्टिव्ह’ करण्यात आपल्याला यश आले, असे त्यांनी सांगितले.
कोलतेंबाबतची खंत
पोलीस शिपाई दीपक कोलते यांची हत्या करणा-या आरोपीला पकडण्यात अपयश आले, ही मोठी खंत असल्याची भावना मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी व्यक्त केली. आपली ही खंत नवीन अधीक्षक त्रिपाठी यांनी दूर करावी, असे त्यांनी सांगताच त्रिपाठी यांनी आपण त्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.