इस्लामपूरचे नगरसेवक खंडेराव जाधव याला फरारी होण्यास मदत केल्या प्रकरणी पोलीस कर्मचारी अवधूत इंगवले याला निलंबित करण्यात आले. संशयित आरोपीस मदत केल्या प्रकरणी पोलिसासह आंबा येथील रिसॉर्टचे मालक रणवीर गायकवाड या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून इंगवले याला अटक करण्यात आली आहे. टाळेबंदीच्या काळामध्ये मद्य विक्री प्रकरणी कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी नगरसेवक जाधव याला पोलिसांनी रविवारीच अटक केली आहे.

इस्लामपूरमध्ये करोनाचे रुग्ण आढळल्याने काही भाग सील करण्यात आला होता. या सील केलेल्या भागात नगरपालिकेच्या कचरा वाहक घंटागाडीतून मद्य पुरवठा केला जात असल्याचा आरोप झाल्यानंतर मुख्याधिकारी श्रीमती पवार यांनी कारवाईचे आदेश दिले होते. यामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक जाधव याने कार्यालयात घुसून खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती.

मात्र, हा प्रकार घडल्यापासून जाधव फरारी होता. तब्बल १३ दिवसांनी रविवारी पहाटे शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील रिसॉर्टमध्ये पोलिसांनी त्याला अटक केली. जाधव याला फरार होण्यात आणि जिल्हा बंदीतून बाहेर पडण्यात कोकरूड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी अवधूत इंगवले याने मदत केल्याची माहिती तपासात पुढे येताच त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्य़ातील पोलिसाचा सहभाग लक्षात येताच पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी तातडीने पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच रिसॉर्ट मालक गायकवाड यांनाही आरोपी करण्यात आले असून त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘मोक्का’अंतर्गत कारवाई होणार?

दरम्यान, गर्दी, मारामारी, खुनाचा प्रयत्न, शासकीय कर्मचाऱ्यावर हल्ला करणे आदी प्रकरणी जाधव याच्याविरुद्ध विविध गुन्हे इस्लामपूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. जाधव याच्याविरोधात आता ‘मोक्का’अंतर्गत कारवाई होणार का याकडे इस्लामपूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.