पोलीस भरतीदरम्यान पाच किलोमीटर धावण्याचे अंतर पूर्ण केल्यानंतर चक्कर आल्याने विकास श्रीधरराव गायकवाड या उमेदवारावर जिल्हा शासकीय रुग्णालयावर उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती चांगली आहे.
जिल्हा पोलीस दलात भरती प्रक्रिया सध्या सुरू असून बुधवारी पहाटे ५ वाजता कृषी विद्यापीठ परिसरात उमेदवारांची धावण्याची चाचणी सुरू होती. भरतीत विकास गायकवाड (उखळी, तालुका औंढा) या युवकानेही सहभाग घेतला. पाच किमी धावण्याच्या चाचणीत त्याने सहभाग नोंदवला. निर्धारित अंतर पूर्ण केल्यानंतर तो चक्कर येऊन जागेवरच कोसळला. भरती प्रक्रियेदरम्यान रुग्णवाहिका सज्ज असल्यामुळे विकासवर तत्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर त्याला डॉ. बी. टी. धूतमल यांच्या पथकाने अधिक उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले.
पोलीस अधीक्षक संदीप पाटील सहकाऱ्यांसह जिल्हा रुग्णालयात आले. पाटील यांनी यावेळी विकासला सर्व आरोग्य सुविधा तातडीने पुरविण्यात लक्ष घातले. विकासने पाच किमी अंतर पूर्ण करून २० पकी १८ गुण मिळवले. यापूर्वी त्याने मदानी चाचणीही पूर्ण केली. बारावीनंतर डी. एड. केलेल्या विकासने पोलीस भरतीत सहभाग घेतला.
पोलीस भरतीदरम्यान पाच किमी धावण्याच्या चाचणीपूर्वी सर्व उमेदवारांना ग्लुकोज, बिस्कीट, केळी देण्यात येत असून, सर्व उमेदवारांनी धावण्यापूर्वी उपाशीपोटी राहू नये, याची खबरदारी घेतली जात आहे. धावण्यापूर्वी काही खाल्ले तर पुरेशा चपळाईने धावता येत नाही, असा गरसमज उमेदवारांनीही करून घेऊ नये. कुठल्याही परिस्थितीत ते उपाशीपोटी राहणार नाहीत, या बाबत आवाहन वारंवार करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक पाटील, अतिरिक्त अधीक्षक नियती ठाकर, सहायक अधीक्षक प्रणय अशोक यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर आदी भरतीदरम्यान सर्व बाबींवर बारीक लक्ष ठेवून आहेत.