पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई

चंद्रपूर : लगतच्या तेलंगणा राज्यात मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या, हवेत बंदूक भिरकावल्या प्रकरणी राजुरा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय गोमलाडू यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. तर पोलीस शिपाई सचिन भोयर यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

राजुरा ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय गोमलाडू यांनी गेल्या आठवडय़ात तेलंगणा राज्यात जाऊन मद्यधुंद अवस्थेत बराच धिंगाणा घातला होता. गोयगाव येथील नाक्यावर मालवाहू ट्रक थांबला होता. तिथे ट्रक चालकाशी हुज्जत घातली. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत बंदूक हवेत भिरकावली. या प्रकरणाची तक्रार ट्रक चालकांनी तेलंगणा पोलीस ठाण्यात केली.

प्राप्त तक्रारीच्या आधारावर उपनिरीक्षक गोमलाडू तथा शिपाई सचिन भोयर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घेतली. त्यांनी याचा अहवाल विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठवला. परराज्यात जाऊन पोलीस विभागाची प्रतिमा धुळीस मिळवल्या प्रकरणी उपनिरीक्षक गोमलाडू यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे, तर भोयर यांना निलंबित करण्यात आले.

याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांना विचारले असता, पोलीस उपनिरीक्षक गोमलाडू यांची राजुरा पोलीस ठाण्यात रूजू झाले तेव्हापासूनची माहिती घेऊन चौकशी केली, तसेच त्यापूर्वीचा त्यांचा रेकॉर्ड बघितला.

या चौकशीत गोमलाडू पोलीस खात्यात नोकरी करण्यास योग्य नाही, असे निष्पन्न झाल्याने त्यांना पोलीस खात्यातूनच बडतर्फ करण्यात आल्याची माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.