करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनसह संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या काळात अवैध दारूविक्रीवर नियंत्रण आणण्यात पोलीस विभागास यश आल्याचे चित्र आहे. मात्र गावठी दारूभट्ट्यांचे याच काळात पेव फुटल्याचे निदर्शनास आल्यावर अनेक भट्ट्या उध्वस्त करत पोलिसांनी दहा लाख रुपायांचा दारूसाठा नष्ट केल्याची गत तीन दिवसातील आकडेवारी आहे.

दरम्यान, संचारबंदीच्या काळात रासुलबाद येथील सरपंचाने गावठी दारूविक्रीची परवानगी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितल्याने खळबळ उडाली आहे.

वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मोठ्या प्रमाणात अवैध विक्री होत असल्याचे लपून नाही. बंदीच्या काळात त्यावर नियंत्रण आणणाऱ्या पोलिसांनी गावठी भट्ट्यावर लक्ष ठेवून ग्रामीण भागात छापमारी सुरू केली. नेरी, सावंगी, आनंदनगर,  पुलफाईल या व अन्य भागात वॉश आउट मोहीम राबवत मोहा रसायन, दारू, ड्रम, सडवा व अन्य साहित्य नष्ट केले. पोलीस अधीक्षक डॉ. तेली, अप्पर पोलिस आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे व पथकाने कारवाई करत गावठी दारूचे अड्डे असलेल्यांना धडकी बसवली.