नगर लोकसभा मतदारसंघातून उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती तथा लोकशासन पक्षाचे प्रमुख बी. जी. कोळसे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे जिल्हय़ाच्या राजकीय वर्तुळात कमालीची सतर्कता व्यक्त होऊ लागली आहे. त्यांच्या उमेदवारीला अनेक राजकीय पदर असल्याने याबाबतच्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर लोकसभा मतदारसंघात मागच्या तीन निवडणुकांमध्ये दोनदा राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला. या दोन्ही वेळी तिरंगी लढत होऊन भारतीय जनता पक्षाचे दिलीप गांधी यांनी बाजी मारतानाच या मतदारसंघात बस्तान बसवले. यंदा राष्ट्रवादीने येथून माजी आमदार राजीव राजळे यांना उमेदवारी दिल्याने ते व गांधी अशा दुरंगी लढतीचीच शक्यता व्यक्त होत होती. अन्य उमेदवार रिंगणात उतरणार असले तरी या दोघांमध्येच ही लढत होईल. ही निवडणूक दुरंगी करण्यात यश आल्याच्या खुशीत राष्ट्रवादी असतानाच लोकशासन पक्षाच्या वतीने कोळसे यांनी येथून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केल्याने जिल्हय़ाच्या राजकीय वर्तुळात विशेषत: दोन्ही काँग्रेसमध्ये सतर्कता व्यक्त होऊ लागली असून राष्ट्रवादीत पडद्यामागच्या हालचालींचा मागोवा घेण्यात येत आहे.
कोळसे हे मूळ या मतदारसंघातीलच राहुरीचे रहिवासी आहेत. विविध चळवळींच्या निमित्ताने ते शेतमजूर, कष्टकरीवर्गात सक्रिय आहेत. शिवाय त्यांची वैचारिक जवळीक लक्षात घेऊन त्यामुळेच त्यांच्या उमेदवारीविषयी सतर्कता व्यक्त होऊ लागली आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत हा राजकीय पदरच महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच त्यांच्या हालचालींकडे दोन्ही काँग्रेसचे विशेष लक्ष आहे. लोकसभेची ही निवडणूक कधी नव्हे ती दोन्ही काँग्रेसने कमालीची गांभीर्याने घेतल्याचे दिसते. त्यामुळेच नेत्यांमध्ये मनोमिलन घडवून आणत त्यावरच भर दिला जात आहे. तरीही कोळसे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे ही सतर्कता व्यक्त होऊ लागली आहे.