लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या समर्थकांकडून कोकणात राजकीय हिंसाचार जोमात असून राणे यांचे एकेकाळचे समर्थक मनोहर रेडीज यांना बुधवारी बेदम मारहाण करण्यात आली.
रेडीजत्यांच्या गावाहून खासगी गाडीने लांज्याकडे येत असता वेरवली-लांजा मार्गावर पाठीमागून एका गाडीतून काहीजण पाठलाग करत असल्याचा संशय त्यांना आला. म्हणून त्यांनी गाडी बाजूला घेऊन थांबवली व गाडीतून खाली उतरून जाऊ लागले. त्याच वेळी पाठीमागच्या गाडीतून आलेल्या पाचजणांनी लोखंडी शिगा व काठय़ांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या मारहाणीत रेडीज यांच्या पायांना जबर दुखापत झाली असून खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत रेडीज यांनी राणे यांच्या कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केला आहे.  आधी शिवसैनिक असलेले रेडीज यांनी राणे यांचे समर्थन करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. कालांतराने ते राणे यांच्यापासून दुरावले होते.