लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या मुदतवाढीवरून पश्चिम विदर्भातील राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधरी व विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झटत आहेत. विदर्भ विकासासाठी मंडळाला मुदतवाढ देण्याची गरज भाजप नेते व मंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी व्यक्त केली. मंडळाचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते तुकाराम बिडकर यांनी त्याला प्रत्युत्तर देतांना भाजपचे मंडळावरील प्रेम पुतना मावशीचे असल्याची टीका केली आहे.

राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत ३० एप्रिल रोजी संपुष्टात आली. त्याची मुदतवाढ प्रलंबित असतांना राज्यपालांनी नियोजन विभागाला पत्र पाठवून निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, विदर्भ विकासाचा समतोल राखण्यासाठी वैधानिक विकास मंडळाची नितांत आवश्यकता आहे. अनुशेष दूर करण्यासाठी मंडळाला मुदतवाढ मिळावी, अशी भूमिका चैनसुख संचेती यांनी मांडली. तुकाराम बिडकर यांनी याच भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. भाजप सत्तेत २०१४ पासून चार वर्ष मंडळावर अध्यक्ष नेमला नाही. जून २०१८ मध्ये चैनसुख संचेती यांची निवड करण्यात आली.

मात्र, मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा असल्याने त्यांनी एक वर्षभर पदभार स्वीकारला नाही. एक प्रकारे राज्यपालांच्या आदेशाची अवहेलना केली. मंडळावर इतर सदस्यांची नियुक्ती केली नाही. यावरून भाजपला मंडळाचे किती गांभीर्य आहे हे लक्षात येते. अखेर जून २०१९ मध्ये संचेतींनी पदभार स्वीकारला. मात्र, त्यानंतरही त्यांनी मंडळाकडे कायम पाठ फिरवली. तेच संचेती आज मुदतवाढीची मागणी करीत आहेत, अशी टीका बिडकर यांनी केली.

पश्चिम विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष अजूनही एक लाख ६० हजार हेक्टर आहे. मागील पाच वर्षात भाजप सरकार तो दूर करण्यास सपशेल अपयशी ठरले. अनुशेष दूर करण्याच्या उद्दिष्टांपैकी केवळ २५ टक्केच साध्य करू शकले. अनेक क्षेत्रातील अनुशेष वाढविण्यासाठी भाजप सरकार कारणीभूत ठरले, असा आरोप तुकाराम बिडकर यांनी केला आहे.

महाराष्ट्राचा समतोल विकास साधण्यासाठी विदर्भ, मराठवाडा या अप्रगत विभागांसाठी विकास मंडळाची आवश्यकता निश्चितपणे आहेच. परंतू, भाजपची मुदतवाढीची मागणी ‘राजकीय’ आहे, यात शंकाच नाही.
– तुकाराम बिडकर, माजी अध्यक्ष, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.

अपूर्ण माहितीच्या आधारे तुकाराम बिडकर यांनी हे विधान केले आहे. अध्यक्षपदावर कार्य केलेल्या व्यक्तीने याचे महत्त्व जाणायला हवे. कृषी, आरोग्य, रोजगार आणि शैक्षणिक अनुशेष दूर करण्यासाठी मंडळाला मुदतवाढ मिळणे अत्यावश्यक आहे. मंडळाच्या माध्यमातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात आले.
चैनसुख संचेती, अध्यक्ष, विदर्भ वैधानिक विकास मंडळ