29 May 2020

News Flash

पाणीप्रश्नावरही राठोड यांचे राजकारण- महापौर

केवळ विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचे आमदार अनिल राठोड शहराच्या पाणीप्रश्नाचे राजकारण करीत आहेत.

| June 8, 2014 02:45 am

केवळ विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचे आमदार अनिल राठोड शहराच्या पाणीप्रश्नाचे राजकारण करीत आहेत. राजकारणासाठीच दोन्ही काँग्रेसला विनाकारण बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न असून पाणीप्रश्नावर महानगरपालिकेवर आरोप करण्याआधी त्यांनी त्यांच्या अडिच वर्षांच्या काळात या योजनेसाठी काय प्रयत्न केले, याचे उत्तर द्यावे असे आव्हानही जगताप यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिले.
शहर व परिसरास गेल्या आठ, दहा दिवसांपासून वादळी पाऊस व तत्सम गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे वीज वितरणात सातत्याने मोठय़ा अडचणी येत असून अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, खांब उन्मळून पडले, त्यामुळे वीजपुरवठाच खंडीत झाला. हे अडथळे सातत्याने येत असून त्याची तपशीलवार माहितीच जगताप यांनी पत्रकारांना दिली. तारखेनिहाय तपशील त्यांनी दिला आहे. या सर्व गोष्टींची राठोड यांना पूर्ण कल्पना आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे वीजपुरवठय़ातच व्यत्यय येत असेल तर, पाणीपुरवठय़ावर त्याचा परिणाम होणारच. मात्र या नैसर्गिक आपत्तींचेही राठोड यांच्याकडून राजकीय भांडवल केले जात असून सवंग लोकप्रियतेचा हा केविलवाणा प्रयत्न आहे असे प्रतिपादन जगताप यांनी केले.
जगताप म्हणाले, आपल्या महापौरपदाच्या मागच्या कारकिर्दीतच केंद्र सरकारच्या अर्थसहाय्यातून शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी ११६ कोटी रुपयांची फेज-२ योजन आपण मंजूर करून घेतली. पुढच्या अडीच वर्षांत मनपात शिवसेनेचीच सत्ता होती, मात्र त्यांना ही मंजूर योजना मार्गी लावणेही जमले नाही. त्यांच्याच  काळात ही योजना रेंगाळली. गेल्या जानेवारीत महापौरपदाची सूत्रे पुन्हा हाती घेताच आपण प्राधान्याने या योजनेला गती दिली असून सध्या साप्ताहिक आढावा घेऊन कामांना गती देण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराला कालमर्यादा दिली असून त्यावर दंडात्मक कारवाईसुध्दा करण्यात येत आहे. योजना रेंगाळल्यानंतरही शिवसेनेनेच या ठेकेदाराला मुदतवाढ दिली, विलंबाबद्दल कोणती कारवाईसुध्दा केली नाही, मोर्चा काढण्याआधी राठोड यांनी या गोष्टींचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असा टोलाही जगताप यांनी लगावला.
जगताप म्हणाले, मुळा धरण व वसंत टेकडी येथे वाढीव क्षमतेची यंत्रणा उभारणे गरजेचे असून त्यासाठी साडेपाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा धनादेशही मनपाने वीज वितरण कंपनीला दिला, मात्र जुन्या थकबाकीमुळे ती आधी भरा असे कळवून हा धनादेशच त्यांनी परत पाठवून दिला, त्यावर शिवसेनेने काय कार्यवाही केली, याचा जाहीर खुलासा करावा असे आव्हान जगताप यांनी दिले. राजकारणाच्या नजरेतून या प्रश्नाकडे पाहू नये, सुधारीत पाणीपुरवठा योजनेलाही आता गती देण्यात आली असून शक्य तितक्या लवकर ही योजना पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न सुरू असून त्याचे श्रेय मिळू नये साठीच शिवसेना व राठोड दोन्ही काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप जगताप यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2014 2:45 am

Web Title: politics of anil rathod on water issue mayor
टॅग Mayor,Politics
Next Stories
1 कोल्हापुरात १६ जून पासून टोल वसुली?
2 ‘प्रभाग टँकरमुक्त करू न शकणारे शहराचा विकास काय करणार’
3 सोलापुरात काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढू लागली
Just Now!
X