महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सर्वात प्रदूषणकारी असलेल्या एका उद्योजकाचा प्रदूषणकारी कारखाना बंद करण्याचे व उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सर्वेक्षणात नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आल्याने कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

तारापूर औद्यागिक क्षेत्रातील प्रदूषणकारी आरती ड्रग्ज लि. प्लॉट नं. ई—२१, या कंपनीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादन बंदची कारवाई केली आहे. या कारखानदाराच्या वाढत्या प्रदूषणाबाबत व या उद्योग समूहाच्या विविध कंपन्यांमधून निघणाऱ्या रसायनिक सांडपाणी व घातक घन कचऱ्याची विल्हेवाट मागील अनेक वर्षांंपासून राज्याच्या विविध भागात नैसर्गिक स्रोतांमधे लावली जात असल्याबाबत उघडकीस आले होते. यातच मागील महिन्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात उपप्रादेशिक अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणादरम्यान  कंपनीत पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण नियमांचे पालन केले जात नसल्याचे आढळून आले होते. यात प्रामुख्याने या कारखान्यात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या डायथिल सल्फॉक्साईड (डीएमएसओ) च्या निर्मिती प्रक्रिये दरम्यान निघणारे रसायन आणि त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जात आहे याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली नसल्याचे कारखाना बंद करण्याचे देण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. उत्पादन येत्या ७२ तासात बंद करण्याचे तसेच वीज व पाणीपुरवठाही खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.