पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर आणि विरोधकांकडून टीका होत असल्यानं राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संजय राठोड यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राठोड यांचा राजीनामा फ्रेम करण्यासाठी नाही, असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाचं नसल्याचं वृत्त आहे. त्यामुळे आता राठोड यांच्या राजीनाम्याचं पुढे काय झालं. राठोड अजूनही मंत्रीपदी कसे? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीडमधील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप करत भाजपानं राजीनामा घेऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. अधिवेशन चालू न देण्याचा इशारा भाजपानं दिला होता. पूजा चव्हाण प्रकरणावरून विरोधकांकडून कोडीं होण्याची शक्यता असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

रविवारी (२८ फेब्रुवारी) संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी सपत्नीक भेट घेतली आणि राजीनामा सुपूर्द केला. राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर कार्यवाही होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. “राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, राजीनामा घेऊन दोन-तीन दिवस लोटले, तरीही संजय राठोड मंत्रीपदी कायम आहेत. संजय राठोड यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे राठोड कायदेशिरदृष्ट्या अजूनही मंत्रिपदी कायम आहेत. तर दुसरीकडे राठोड यांच्या राजीनाम्याचं पुढे काय झालं, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

अहवाल आल्यानंतरच राजीनामा?

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने शिवसेनेतील नेत्याचा हवाला देत यासंदर्भात वृत्त दिलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा महिना अखेरीपर्यंत स्वतःकडेच ठेवू शकतात. सध्या पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणावरून राठोड यांच्यावर आरोप झालेले असून, अहवाल आल्यानंतर राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाऊ शकतं किंवा त्यांच्याकडे दुसरं खातं दिलं जाऊ शकतं, असं शिवसेना नेत्यांनं सांगितल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. त्याचबरोबर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे आलेला नसल्याचं वृत्त राजभवनातील सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja chavan suicide case sanjay rathod resignation uddhav thackeray governor koshyari bmh
First published on: 03-03-2021 at 09:52 IST