अंडय़ाच्या दरातील घसरण आणि कच्च्या मालाच्या दरातील वाढीचा परिणाम

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

अंडय़ाच्या दरात झालेली घसरण आणि कच्च्या मालाच्या दरात झालेली एकतर्फी वाढ यामुळे राज्यातील ‘पोल्ट्री’ व्यवसाय सध्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. औषधे, मिनरल्स, मका यांच्या दरात झालेली वाढ ‘पोल्ट्री’ व्यवसायाच्या मुळावर उठली आहे. ऐन आषाढ महिन्यात या व्यवसायाची ही अवस्था आहे, तर आगामी श्रावण महिन्यात तर हा व्यवसाय चालवणेही अवघड होणार असल्याची भीती व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

शेतीपूरक व्यवसाय म्हमून कुक्कुटपालनाचा प्रसार अनेक ठिकाणी झाला आहे. रोख उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याने अनेक बेरोजगार तरुणांनी कर्ज काढून या व्यवसायासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे.  मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांत मका, डी-ऑईल्ड राईस ब्रान (डीओआरबी), औषधे, मिनरल्स या सर्व प्रकारच्या कच्च्या मालाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तुलनेत दुसऱ्या बाजूला अंडय़ाच्या दरात मात्र घसरण झाली आहे. या दुहेरी संकटामुळे हा व्यवसाय सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायासाठी लागणाऱ्या मालाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कोंबडय़ांच्या खाद्यात मिसळला जाणारा ‘डीओआरबी’ या घटकाची तब्बल ५० टक्के दरवाढ झाली आहे. मक्याचे दर वाढत २५ रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. एका बाजूला मक्याचे दर वाढत असताना बाजारात मक्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. कोंबडी खाद्यामध्ये मक्याचा वापर मोठय़ा प्रमाणावर करावा लागत असल्याने कोंबडी खाद्य निर्मितीचा उत्पादन खर्च खूपच वाढला असून मक्याच्या टंचाईमुळे त्यात आणखी भर पडत आहे. मक्याची साठेबाजी करुन कृत्रिम टंचाई केली गेली असावी, अशी व्यावसायिकांना शंका असून शासनाने याबाबत साठेबाजांवर कारवाई करून मका रास्त दरात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

त्याचबरोबर कोंबडी खाद्यासाठी लागणारी औषधे, मिनरल्स यांच्या दरातही वाढ झाल्याने अंडय़ाचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. तर दुसऱ्या बाजूला मागील काही दिवसांपूर्वी ४८५ रुपये शेकडा असलेले अंडय़ाचे दर तब्बल ३५ टक्क्य़ांनी कमी होत ३०५ रुपयांवर आले आहेत. कच्च्या मालाचा वाढलेला खर्च आणि अंडय़ाच्या घसरलेल्या दरामुळे या व्यवसायाचे अर्थशास्त्रच सध्या बिघडले आहे. याबाबत शासनाच्या जोडीने राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने (नेक) सुद्धा याचा गंभीरपणे विचार करण्याची मागणी व्यावसायिकांमधून होत आहे. ऐन आषाढ महिन्यात या व्यवसायाची ही अवस्था आहे, तर आगामी श्रावण महिन्यात तर हा व्यवसाय चालवणेही अवघड होणार असल्याची भीती व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.

अंडय़ाला हमी भाव हवा

केंद्र शासनाने या व्यवसायातील ही अनिश्चितता लक्षात गेत अंडय़ालासुद्धा किमान हमी भाव जाहीर करून कुक्कुटपालक शेतकऱ्याच्या मालाला संरक्षण देणे आवश्यक आहे. तसेच बर्ड फ्लूच्या संकटाचेवेळी शासनाच्या केंद्रीय अन्न महामंडळाकडे (एफसीआय) असलेला गहू, तांदळाचा साठा कुक्कुट व्यावसायिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला होता तसा आत्ताही करून देऊन सहकार्य करणे आवश्यक असल्याचे मत विटय़ातील पोल्ट्री व्यावसायिक शत्रुधन जाधव, ज्ञानेश्वर िशदे यांनी व्यक्त केले.