के.सी. ठाकरे अर्थात प्रबोधकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबोधकारांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन केलं आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करत प्रबोधकरांच्या शिकवणीची आठवण करून दिली.

राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांकडून प्रबोधकार ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत अभिवादन केलं जात आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करून प्रबोधकारांच्या आठवणी सांगितल्या.

“जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे’ ही शिकवण आमचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची. ‘उक्ती आणि कृती’ यांचा उत्तम मेळ कसा असावा, हे आजोबांच्या आयुष्याकडे बघितलं की लक्षात येतं. लोकहितवादी, आगरकर आणि महात्मा ज्योतिबा फुलेंच्या समाजसुधारणांना पुढे नेणारे ते निडर समाजसुधारक होते. पाखंडी मानसिकता, अनिष्ट रूढी, जाती-व्यवस्था ह्या विरोधात दोन हात करण्यासाठी त्यांनी वक्तृत्व, लेखन आणि प्रत्यक्ष कृती ही शस्त्रं वापरली,” असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

“पुढे वय झालेलं असताना देखील त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. या चळवळीतील विविध पक्षांना, विचारधारांना एकत्र बांधून ठेवणं निव्वळ त्यांनाच शक्य होतं. कुठल्याही चुकीच्या गोष्टीच्या विरोधात संघर्ष करताना त्यांचं वय कधीच आड आलं नाही आणि त्याच ताकदीने ते आसूड ओढत राहिले. निरंतर संघर्षाची प्रेरणा त्यांच्याकडूनच मिळाली आहे. आजोबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी प्रबोधकारांना अभिवादन केलं.