प्रबोध देशपांडे, अकोला

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. युती-आघाडीची समीकरणे उदयास येत आहेत. १६ व्या लोकसभेत खासदारांची कामगिरी नेमकी कशी होती. त्यांनी केलेली विकासकामे, मतदारसंघातील सद्य:स्थिती तसेच विरोधकांची भूमिका याबाबत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा थोडक्यात आढावा आजपासून ..

गेल्या साडेचार वर्षांमध्ये अकोला लोकसभा मतदारसंघात विकास निधीचा ओघ सुरू झाला. अनेक विकास कामांचादेखील धडाक्यात ‘श्रीगणेशा’ करण्यात आला. मात्र, तांत्रिक अडचणींसह विविध कारणांमुळे विकासकामांची संथ गती आहे. त्यामुळे कामांच्या पूर्णत्वाची प्रतीक्षा लागली आहे. भाजप, काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढतीचा भाजपला फायदा होतो हे स्पष्टच आहे. यंदाही तिरंगी लढत होते का याची उत्सुकता असेल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती व सामाजिक समीकरण बघता भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अकोला मतदारसंघाची ओळख होती. मात्र गेल्या तीन दशकांत काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढणे भाजपच्या पथ्यावर पडत गेले. १९९८-९९ व १९९९-२००४ मध्ये भारिप-बमसंचे अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा गाठली. या दोन निवडणुकांचा अपवाद सोडल्यास प्रत्येकी तीन वेळा भाऊसाहेब फुंडकर आणि खासदार संजय धोत्रे विजयी झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संजय धोत्रे यांनी काँग्रेसच्या हिदायत पटेल यांचा २,०३,११६ मतांनी पराभव केला होता. अकोला हा प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला. दोनदा त्यांनी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. यंदा काँग्रेस आघाडीबरोबर यावे म्हणून काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने एमआयएमशी आघाडी केली आहे. यामुळे दलित व मुस्लीम मतांची मोट बांधली जाते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भीमा-कोरेगावनंतर राज्यात दलित समाजात आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा आंबेडकर यांनी प्रयत्न केला. गेल्या वेळी अकोल्यातच तिसऱ्या क्रमांकावर त्यांची पीछेहाट झाली होती. यामुळे यंदा प्रकाश आंबेडकर कोणती भूमिका घेतात यावर राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

अनेक विकासकामे मार्गी

अमरावती-चिखली महामार्गाचे चौपदरीकरण, अशोक वाटिका-रेल्वेस्थानक उड्डाणपूल, अकोला-नांदेड महामार्ग, डाबकीमार्ग उड्डाणपूल, न्यू तापडिया नगर उड्डाणपूलसह अंतर्गत रस्त्यांसाठी कोटय़वधींच्या निधी मिळाला. अमरावती ते चिखलीपर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम मार्गी लावले. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ८०० कि.मी.वर रस्ते करण्यात आले असून, अनेक पुलांची उभारणी करण्यात आली. अकोला-अकोट रेल्वेमार्ग ब्रॉडगेजचे काम गतीने पूर्णत्वास जात आहे. अकोट-खंडवा रेल्वेमार्गामध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पामुळे अनेक अडचणी आल्या. त्यामुळे अद्यापही हे काम सुरू होऊ शकले नाही. केंद्र सरकारच्या निधीत राज्य शासनाचा वाटा टाकून सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. शिवणी विमानतळासाठी कृषी विद्यापीठाची जमीन घेतल्यावरही खासगी जमिनीचा तिढा कायम आहे. केंद्र शासनाच्या जलसमृद्धी योजनेतून सिंचन प्रकल्पांचे रखडलेले काम सुरू करण्यात आले. शहरात अमृत योजनेसह इतर योजनांमधून विकास कार्य राबविण्यात आले. शहरातील सिमेंट रस्त्यांचे मात्र निकृष्ट काम चव्हाटय़ावर आले. यातील दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई झाली नाही. प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला, सौभाग्य, जनधन, मुद्रा आदी केंद्र शासनाच्या योजनांची अंमलबजावणी झाली. शेती, औद्योगिक विकास व खारपाणपट्टय़ाचे प्रश्न कायम आहेत.

भाजपमध्ये गटबाजी

खासदार संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यातील गटबाजी अनेक वेळा विकासकामात अडसर ठरला. खा. संजय धोत्रे यांची पक्ष संघटनेवर मजबूत पकड आहे. तळागाळात कार्यकर्त्यांचे जाळे, ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर यांची साथ, महापालिकेतील नगरसेवकांचे समर्थन, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व आदी खा. धोत्रेंच्या नेतृत्वाच्या जमेच्या बाजू आहेत. विरोधी गटाकडून लोकसभेमध्ये उमेदवार बदलण्याच्या वावडय़ाही उठवल्या जातात. मात्र, तशी शक्यता दिसत नाही. मुस्लीम, दलित, मराठा, कुणबी समाजाचे प्राबल्य असलेल्या अकोला मतदारसंघात काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ आणि भाजप अशी तिरंगी लढत नेहमीच होते.

केंद्रापासून ते महापालिकेपर्यंत भाजपची सत्ता असल्याने अनेक विकास कामे मार्गी लावण्यात यश आले. राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपूल, रस्ते, सिंचन प्रकल्प आदींची कामे मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. मुद्रा, उज्ज्वला, सौभाग्य आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. जनधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसह लाभार्थ्यांचे बँक खाते उघडून अनुदानाचा थेट लाभ मिळवून देण्यात आला. काही कामे तांत्रिक अडचणीमुळे रखडली आहेत. अडचणी पूर्ण करून ती कामे पण मार्गी लावण्यात येतील. जिल्हा परिषदेमध्ये सत्ता नसल्याने ग्रामीण भागातील कामांसाठी जि.प. एनओसीची समस्या निर्माण झाली. त्यातून मार्ग काढत घरकुल योजना, पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक कामे केली आहेत.

– संजय धोत्रे, खासदार, अकोला.

खासदार संजय धोत्रे यांची साडेचार वर्षांतील कामगिरी असमाधानकारक राहिली. त्यांनी कोणतेही मोठे काम केल्याचे दिसून येत नाही. अकोला-खंडवा रेल्वेमार्ग अपूर्ण आहे. अकोला-अकोटचे काम संथगतीने सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीत गडकरी यांनी अकोल्यात येऊन नुसत्या घोषणा केल्या. सिंचन प्रकल्प, महामार्गासह सर्व कामे मात्र अपूर्ण आहेत. उड्डाणपुलाचे कामही सुरू झाले नाही. शेती, उद्योगाचे प्रश्न सुटले नाहीत. रस्त्यांसह इतरही कामांमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे.

      – हिदायत पटेल, काँग्रेस जिल्हाध्यक्ष