अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे स्पष्टीकरण

‘महाराष्ट्र बंद’वेळी राज्यभर ज्या हिंसक कारवाया झाल्या ती प्रतिक्रिया असली तरी त्याचे मी समर्थन करणार नाही, असे स्पष्ट शब्दांत सांगत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी या घटनांचाही निषेध केला.

सांगलीत पत्रकार परिषदेत अ‍ॅड. आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, की ‘महाराष्ट्र बंद’वेळी राज्याच्या अनेक भागात हिंसाचाराच्या घटना घडल्या. पण भीमा कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीची ती एक प्रतिक्रिया होती. तरीही मी या प्रतिक्रियेत घडलेल्या हिंसाचाराचे समर्थन करणार नाही.

सध्या अतिरेकी धार्मिकतेमुळे सध्या भारताचा पाकिस्तान होण्याचा धोका असल्याचे सांगत अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, देशात धार्मिक राजकारणात असलेल्या काही अतिरेकी संघटना अनियंत्रित बनत आहेत. या अनियंत्रित संघटनांमुळेच समाजात बेबनाव निर्माण होतो आहे. या अनियंत्रित संघटनांवर नियंत्रण ठेवण्याचे काम शासनाचे आहे. मात्र, जर हे नियंत्रण ठेवले नाही तर आज पाकिस्तानची जी अवस्था झाली आहे तशी भारताची अवस्था होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आज पाकिस्तानने हाफिज सईदला दिलेली मोकळीक त्यांच्याच अंगलट आली असून हीच स्थिती आपल्या देशातही निर्माण होउ शकते. यामुळे भारताचा पाकिस्तान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश बापट यांच्याविरूध्द समाजमाध्यमामध्ये धमकी देऊनही कारवाई होत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूध्द समाजमाध्यमात काही लिहिले तर लगेच कारवाई केली जाते. गेल्या काही दिवसांमध्ये निघालेल्या विविध मोचार्ंमुळे समाजात निर्माण झालेले संशयाचे वातावरण दूर होणेही गरजेचे असल्याचे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

आठवलेंवर टीका

कोल्हापूर – प्रसारमाध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. मी कालही राजा होतो, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार, असे सांगत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर येथे शनिवारी शरसंधान साधले. ते  कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.