प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या भानगडीत पडण्यापेक्षा भाजपासोबत यावे एखादे मंत्रीपद मिळेल, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. ते औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

आठवले म्हणाले, महायुतीला फायदा मिळवून देण्यासाठी प्रकाश आंबेडकर वंचित आघाडी तयार करीत आहेत. ही वंचितांची नाही तर वंचित नेत्यांची आघाडी असल्याची संभावना त्यांनी केली. स्वतंत्ररीत्या लढून मतं खाण्याने काही फायदा होणार नाही त्यापेक्षा भाजपासोबत आलेलं केव्हाही चांगलं.

दुसर्‍या एका प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले, शिवसेना भाजपा भांडत भांडत एकत्र येतात. निवडून आले की पुन्हा भांडतात त्यात नवीन काही नाही. जर भाजपा शिवसेनेची युती झालीच नाही तर आरपीआयला राज्यात ३५ मिळतील जर युती झाली तर ४० ते ४५ जागा मिळतील तेव्हा युती व्हावी असे आपल्यालाही वाटते असे ते म्हणाले.

मराठा समाजाचा केंद्रीय ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी औरंगाबादचे एक शिष्टमंडळ आपल्याला भेटले होते. पण त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश केला तर पुन्हा ओबीसी भडकतील. त्यामुळे त्यांनी स्वतंत्रपणे आरक्षणाची मागणी करावी आम्ही संसदेत या आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्यासाठी प्रस्ताव मांडणार आहोत, असे त्यांनी सांगितले. तीन राज्यात भाजपा सरकार पडल्यामुळे घाबरून पेट्रोल, जीएसटीमध्ये सरकारने कपात केल्याच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलेल्या आरोपाची यावेळी त्यांनी खिल्ली उडवली.