मुंबई तसंच संपूर्ण राज्यातल्या आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना सरकार स्वतःची पाठ थोपटत बसलं आहे. त्यापेक्षा करोनाच्या उपाययोजना करा, आम्ही सोबत आहोत असं सांगत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे.

करोनाविरुद्धच्या लढ्यात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामगिरीबद्द्ल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचं कौतुक केलं. त्याबद्दल बोलताना दरेकर म्हणाले, “कौतुकाची प्रेसनोट मुख्यमंत्री कार्यालयातून आली आहे, पंतप्रधान कार्यालयातून नाही. आम्हाला कौतुक वाटत नाही पण आमचं म्हणणं हेच आहे की, मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. आजही रुग्णांना, आयसीयू बेड, ऑक्सिजन असलेले बेड मिळत नाहीत, रेमडेसिविर मिळत नाही.”

सरकार पब्लिसिटी स्टंट करण्यावरच जास्त लक्ष देत आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर बातम्या पेरुन कोडकौतुक करुन घेत असल्याचा आरोपही केला आहे. ते म्हणतात, “आपली पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य व्यवस्थेत ज्या कमतरता आहेत, त्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही सगळे सोबत आहोत. पण एखादी पीआर एजन्सी नेमून, बातम्या पेरुन आपलं कोडकौतुक करायचं आता हे बास करा. लोकांना आता समजायला लागलं आहे की तुमच्या सगळ्या बातम्या पेरलेल्या आहेत. त्यामुळे करोनाच्या उपाययोजना करण्याऐवजी यांचा जास्त वेळ पब्लिसिटी स्टंट करण्यात जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने प्रचंड गोष्टी दिल्या आहेत. म्हणूनच आज इथली आरोग्यव्यवस्था टिकून आहे. पण हे केंद्रावर टीका कऱणं थांबवत नाहीत. आम्ही सहकार्य करतो पण या गोष्टी थांबवा. लोकांवर चांगला प्रभाव पाडण्याचा प्रयत्न माध्यमांच्या साहाय्याने होणार नाही तर तो कृतीतून होणार आहे.”

राज्यातील करोना परिस्थिती, रेमडेसिविर, प्राणवायू आणि लसींच्या तुटपुंज्या पुरवठ्यावरून एकीकडे राज्य सरकारकडून सातत्याने केंद्रावर टीका केली जात असतानाच दुसरीकडे राज्याच्या करोनाविरोधातील लढ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तोंडभरून कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत राज्यातील करोना स्थितीची माहिती घेतली. करोनाच्या दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, अशा शब्दांत मोदी यांनी राज्याच्या यंत्रणेचे कौतुक केले.