जालना : शेतकरी आणि राज्यातील जनता संकटात असताना राज्य सरकार घरात बसलेले असून आपली जबाबदारी पार पाडीत नाही, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शनिवारी जालना दौऱ्यात केली.

अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे केले जात असून अनेक शेतकरी पंचनाम्यापासून वंचित असल्याचे सांगून दरेकर म्हणाले, आठवडाभरात शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर भाजप संघर्ष करेल. राज्य सरकार भांबावलेले आहे. फक्त सत्ता टिकविणे आणि वैयक्तिक स्वार्थासाठी वादविवाद करणे एवढेच सरकारमधील घटक पक्षांत सुरू आहे. आर्थिक अडचण सांगून त्यासाठी केंद्राकडे बोट दाखविले म्हणजे ‘नाचता येईना-अंगण वाकडे’ असा प्रकार आहे. राज्य सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करो किंवा न करो त्याच्याशी आम्हाला काही देणे-घेणे नाही. परंतु कोकणातील चक्रीवादळ, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील महापूर, मराठवाडय़ातील अतिवृष्टी, वाढत चाललेले करोना रुग्ण इत्यादी जनतेच्या प्रश्नाकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. अतिवृष्टीने शेती उद्ध्वस्त झाली असली तरी सरकार त्याकडे पाहायला तयार नाही.

हाथरस प्रकरणी पंतप्रधान गप्प का, असा प्रश्न खासदार संजय राऊत विचारत असल्याचे निदर्शनास आणून दिले असता दरेकर म्हणाले, महाराष्ट्रातील रोहा, िपपरी तसेच करोनाच्या अलगीकरण केंद्रात महिलांवर अन्याय-अत्याचार झाले, त्यावेळी राऊत झोपले होते का?  राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबद्दल ते किंवा गृहमंत्री कधी बोलले नाही. हाथरसच्या प्रकरणाची भाजपनेही निंदा केलेली आहे. हाथरसमधील घटनेचा वापर ते राजकारणासाठी करीत आहेत, असेही दरेकर म्हणाले. आपल्या दौऱ्यात त्यांनी बदनापूर आणि जालना तालुक्यात काही गावांमधील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे

जालना जिल्ह्य़ात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरीच्या तुलनेत १५८ टक्के पाऊस झाला. जून ऑगस्टदरम्यान अतिवृष्टीमुळे १ लाख सात हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या संदर्भात पंचनामे पूर्ण झाले आहेत. तर १९ ते २३ सप्टेंबरदरम्यान या अतिवृष्टीने १ लाख ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात नुकसानीचे सर्व पंचनामे येत्या १५ दिवसांत पूर्ण होतील, अशी माहिती यानिमित्ताने संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने देण्यात आली.