देशात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यातील विविध भागांप्रमाणे पालघरमध्येदेखील अवकाळी पावसाची रिमझिम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याचे पाहण्यास मिळाले. अचानक पडलेल्या पावसाने   शेतकरी, मच्छीमार, वीटभट्टी, गवत व्यावसायिक आदींचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दाटले होते. गुरुवारी रात्री गारवा आणखीन वाढल्याने डहाणू व पालघर तालुक्यांत अनेक ठिकाणी मध्यरात्रीनंतर रिमझिम पाऊस सुरू झाला. शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बंदर पट्टीच्या भागात दोन-तीन तास मुसळधार पाऊस पडला. खरीप हंगाम संपला असल्याने भातशेतीवरील या पावसाचे संकट टळले असले तरी आधीच हा हंगाम एक महिना पुढे ढकलला गेल्याने कापणी केलेले मात्र न झोडलेले भात भिजल्याने  नुकसान झाले आहे. हा हंगाम सुक्या गवत पावळीच्या कापणीचा हंगाम असल्याने गवत, पावळी भिजून गेली आहे.

या अवकाळी पावसामुळे वीटभट्टय़ा व्यावसायिकांच्या  विटांची रास पावसामुळे खराब झाली आहे. ज्या भट्टय़ा सुरू आहेत त्या पावसाच्या सरींमुळे विझून विटा कच्च्या राहिल्याने नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

मासळीच्या सुकण्याच्या या ऐन हंगामात पाऊस पडल्याने सुकी मासळी ओली होऊन कुजण्याची दाट शक्यता आहे. पालघर किनारपट्टीतील मच्छीमार गावांमधील सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.  मिठागरांमध्ये मीठ उत्पादनासाठी डिसेंबर ते मार्च हा काळ खूप महत्त्वाचा असतो. त्यातच अवकाळीने मीठ उत्पादक अडचणीत सापडले आहेत. किनारपट्टीलगतच्या फळबागा पावसाने भिजल्याने हवामानात आद्र्रता येऊन फळांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.

गेल्या काही दिवसांपासून लग्नसराई सुरू असल्याने अचानक दाखल झालेल्या पावसामुळे नागरिकांची तसेच कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची भंबेरी उडाली. काही भागांत मुसळधार पाऊस झाल्याने खोलगट भागात पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडले.

आरोग्य धोक्यात

अवकाळीमुळे हवामानातील गारवा व आद्र्रता वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. अशा हवामानामुळे सर्दी,पडसे, खोकला, ताप येणे, थंडी वाजणे व त्यातून आजारी होणे असे आजार बळावू शकतात. त्यातच करोनाकाळ सुरू असल्याने नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहन, पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर गावित यांनी केले आहे.