17 November 2017

News Flash

अवघ्या तासाभरासाठी तुरुंगातून छगन भुजबळांची सुटका

विधानसभेत छगन भुजबळांचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून स्वागत

मुंबई | Updated: July 17, 2017 3:35 PM

भुजबळांनी बजावला मतदानाचा हक्क

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीला सकाळपासूनच सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी तुरूंगाबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे ऑर्थर रोड तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. तर राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत आहेत. या दोघांनाही पोलीस बंदोबस्तात तुरुंगाबाहेर आणण्यात आलं, त्यानंतर मतदानासाठी त्यांना विधानसभेत नेण्यात आलं. छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोन्ही नेत्यांचं स्वागत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं. राष्ट्रवादीचे इतर नेतेही यावेळी हजर होते.

मुंबईतही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची लगबग बघायला मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला, भाजपचे गिरीश महाजन, पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांनीही मतदान केलं. तर शिवसेनेचे सुनील प्रभू, नीलम गोऱ्हे यांचीही विधानसभेत मतदानासाठी हजेरी होती.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनीही पीएमएलए कोर्टाकडे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्याची विनंती केली होती. कोर्टानं ही विनंती मान्य करत या दोघांनाही परवानगी दिली होती. आता मतदानाचा हक्क बजावून झाल्यानंतर या दोघांनाही पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याआधीही कोपर्डी प्रश्न आणि मराठा मोर्चावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं होतं. तसंच वाढत्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं योग्य पावलं उचलावीत असाही सल्ला दिला होता. आता आज त्यांनी राष्ट्रपतीपदासाठी मतदान करून आपला हक्क बजावला आहे. त्यानंतर त्यांना आणि रमेश कदम यांना तुरुंगाकडे नेण्यात आलं आहे

First Published on July 17, 2017 3:31 pm

Web Title: presidential poll chagan bhujbal out of jail for hour