मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूरजवळ दोन खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे.  मिनी बस आणि व्होल्वो बसच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी असल्याचं समजतंय. याशिवाय अन्य 12 ते 13 जण किरकोळ जखमी आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.


खालापुर हद्दीत माडप ब्रिजजवळ पुण्या कडे जाणा-या मार्गावर हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातातील एक बस महाबळेश्वर येथे सहलीसाठी जात होती. वसईहून महाबळेश्वरला सहलीसाठी जाणारे 20 जण या बसमध्ये होते. यातील एका बसचालकाने लघूशंकेला जाताना बस रस्त्याच्या कडेला लावली होती. त्याचवेळी मागून आलेल्या दुसरी बस या बसला धडकली.  यामुळे पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक धिम्यागतीने सुरू आहे. तर, अपघातस्थळी  वाहतूक पोलिसांसह स्थानिकांकडून मदतकार्य सुरू असल्याची माहिती आहे.