नेपाळ व चीन देशांच्या हद्दीवर असलेल्या मकालू हिमशिखरावर साताऱ्याच्या प्रियांका मंगेश मोहिते हिने आपले पाऊल ठेवले आहे. बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता तिने मकालूच्या शिखरावर पाय ठेवत या विक्रमाची नोंद केली. असा पराक्रम करणारी ती जगातील सर्वात लहान वयाची गिर्यारोहक ठरली असून प्रियांकाच्या या पराक्रमाचे राष्ट्रीय स्तरावरून अभिनंदन होत आहे.

साताऱ्याच्या प्रियांका मोहिते हिने आपल्या गिर्यारोहणाच्या क्षेत्रात नवनवीन विक्रम केले आहेत. तिने एव्हरेस्ट, ल्होत्से, माउंट किलीमांजारो, माउंट एलब्रुस या जागतिक दर्जाच्या पर्वतावर यशस्वी आरोहन केले आहे. प्रियांकाने मकालूवर बुधवारी सकाळी सव्वानऊ वाजता यशस्वीपणे चढाई केली. नेपाळच्या पायोनिअर अॅडव्हेंचर ग्रुपकडून मकालूच्या मोहिमेत जगभरातील निवडक २२ सदस्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्रियांका मंगेश मोहिते एकमेव भारतीय होती. या ग्रुपचे प्रतिनिधित्व करणारे लाखपा शेर्पा यांनी सकाळी दहा वाजता सॅटेलाईट फोनवरून प्रियांकाच्या या कमगिरीची माहिती साताऱ्यात मंगेश मोहिते यांना दिली.

ताशी पंच्चाहत्तर मैल वेगाने वारे वाहत असतानाही प्रियांकाने मकालूच्या माथ्यावर आपले पाऊल ठेवत नव्या जागतिक विक्रमांची नोंद केली. या शिखरावर पाय ठेवणारी प्रियांका जगातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहक ठरली आहे. चीन व नेपाळ या दोन देशांच्या सीमेवर हिमालयीन महालंगूर पीक म्हणून ओळखले जाणार माउंट मकालूची रचना ही एखाद्या पिरॅमिड प्रमाणे असल्याने त्यावर चढाई करणे एक प्रकारचे आव्हानच होते. पण प्रियांकाने आपला सातारी दमसास दाखवत प्रतिकूल परिस्थितीत चढाईचे आव्हानं यशस्वीरित्या पेलले. सात हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवर असणाऱ्या जगातील दहा पैकी पाच शिखरांवर प्रियांकाने यशस्वी आरोहन केले आहे. प्रियांकांच्या या पराक्रमाची नोंद घेत महाराष्ट्र शासनाने तिला शिवछत्रपती पुरस्कार प्रदानं केला आहे. सध्या प्रियांका बेंगलोर येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असून कंपनीने या मोहिमेसाठी तिला खास एक महिना रजा दिली होती. प्रियांकाच्या या जागतिक दर्जाच्या या पराक्रमाचे साताऱ्याच्याच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळ्या क्रीडापट्टूंडून कौतुक होत आहे.