संरक्षणासाठी कायम अद्ययावत शस्त्रांची निर्मिती करून देणाऱ्या आयुध निर्माणीच्या अंबरनाथ येथील कारखान्यात तंत्रकुशल कर्मचाऱ्यांनी करोनाविरुद्धच्या लढय़ात महत्त्वाच्या ठरणाऱ्या व्हेंटिलेटरच्या निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला आहे. अवघ्या आठ दिवसांत २५ हजार रुपये खर्चून मशीन टूल प्रोटोटाइप कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी आपले अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावून हे यंत्र तयार केले आहे. आयुध निर्माणीच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही हे व्हेंटिलेटर योग्य असल्याचा निर्वाळा दिला आहे.

अंबरनाथ येथील आयुध निर्माणी कारखाना १९५३ सालापासून देशाच्या संरक्षणात आपली मोलाची भूमिका बजावतो आहे. सध्या देशभरात विविध कंपन्या, संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील संघटना व्हेंटिलेटरच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. अंबरनाथच्या आयुध निर्माणीच्या कामगारांनीही या आणीबाणीत आपला वाटा देण्यासाठी अवघ्या आठ दिवसांच्या प्रयोगातून व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे.

निर्माणीतील मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीच्या तंत्रकुशल कर्मचाऱ्यांनी मोटार आणि काही पॅरामेडिकलचे सुटे भाग वगळता कारखान्यात उपलब्ध असलेल्या साधनांतून या व्हेंटिलेटरी निर्मिती केली आहे. रुग्णाच्या गरजेनुसार मिनिटाला १२ ते ३० वेळा श्वास घेण्याची व्यवस्था या व्हेंटिलेटरमध्ये असल्याचे मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरीचे महाप्रबंधक राजीवकुमार यांनी दिली. थेट वीज तसेच बॅटरी अशा दोन्ही पद्धतीने हे व्हेंटिलेटर काम करू शकते. तीन तासांच्या बॅटरी बॅकअप असलेल्या रुग्णवाहिकेतही याचा उपयोग होऊ  शकणार आहे. आयुध निर्माणीच्या कामगारांनी अवघ्या २५ हजार रुपये खर्चून हे व्हेंटिलेटर तयार केले आहे. तसेच निर्माणीच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या चाचणीतही हे व्हेंटिलेटर यशस्वी ठरले आहे. शासनाने मागणी केल्यास आणि परवानगी दिल्यास कामगार युद्धपातळीवर काम करून महिन्याला दोन हजार व्हेंटिलेटर तयार करू शकतात असा विश्वास कारखान्याच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केला आहे.

सध्या देशभरातील आयुध निर्माणीत सॅनिटायझर, मास्क, स्ट्रेचर्स अशा आरोग्य सेवेला अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंची निर्मिती होते.