मोहनीराज लहाडे

कोवळा, लुसलुशीत, गोडवा निर्माण करणारा ज्वारीचा हुरडा. सोबत शेंगदाणे-खोबऱ्याची चटणी, गोडीशेव, दह्य़ाच्या वाटीसह रानमेव्याचा आस्वाद आणि निसर्गरम्य वातावरण. शिवाय बैलगाडीतून शिवारफेरी. ज्वारीचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्य़ात सध्या अशा वातावरणात ‘हुरडा पाटर्य़ा’ रंगू लागल्या आहेत. अनेक शेतकरी व्यावसायिक पद्धतीने हुरडा पाटर्य़ाचे आयोजन करत असल्याने या माध्यमातून कृषी पर्यटनाला चालना मिळत आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगारही उपलब्ध होत आहे.

जिल्ह्य़ात यंदा ज्वारीचे क्षेत्र सुमारे २ लाख ४७ हजार हेक्टरवर आहे. मात्र पाऊस लांबल्याने यंदा ज्वारीच्या पेरण्या कमी झाल्या आहेत. करोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे हुरडा पार्टीसाठी परजिल्ह्य़ातून येणाऱ्यांचे प्रमाणही काहीसे कमी झाले आहे. मात्र असे असले तरी सध्या आस्वाद घेण्यासाठी हुरडा पाटर्य़ाना बहर आलेला आहे.

हुरडय़ासाठी वेगळे वाण

ज्वारीसाठी जिल्ह्य़ात मालदांडी, वसुधा, रेवती, अनुराधा अशी अनेक वाणं आहेत. मात्र हुरडय़ासाठी जिल्ह्य़ात वेगळ्या प्रकारच्या काहीसा गोडवा असणाऱ्या म्हणजे सुरती, गुळभेंडी, दूधमोगरा अशा वेगळ्या वाणांच्या पेरण्या केल्या जातात. कृष्णाष्टमीनंतर ज्वारीची पेरणी सुरू होते. १०० ते ११० दिवसांत हुरडा तयार होतो. नोव्हेंबरचा पहिला आठवडा ते जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत हुरडा खाल्ला जातो. नंतर त्याचे पक्क्या ज्वारीच्या दाण्यात रूपांतर होत असते.

हुरडा पार्टीचा हंगाम जास्तीत-जास्त जास्त लांबवता यावा यासाठी टप्प्याटप्प्याने ज्वारीची पेरणी केली जाते. हुरडय़ासह सकाळच्या चहापासून ते दुपारच्या जेवणापर्यंत स्वतंत्र पॅकेजही आकारले जाते. केवळ हुरडय़ासाठी प्रतवारीनुसार २५० रु. ते ३५० रु. किलोपर्यंत कणसांसाठी दर आकारला जातो. एक किलो कंसामध्ये ४०० ग्रॅमपर्यंत कोरडा निघतो.

कच्च्या दाण्यांच्या स्वरूपातील हुरडय़ाचे एक किलोचे पाकीट ६०० रुपयांपर्यंत विकले जाते. हा हुरडा घरी भाजून खाल्ला जातो. सध्या थंडीचे वातावरण आहे. कणसे भाजण्यासाठी पेटवलेल्या भट्टीच्या कडेने बसून आनंद लुटला जात आहे. हुरडय़ासाठी काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीचा वापर करतात. हुरडा पार्टीमध्ये आता व्यावसायिकता जोपासली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत आहेत. जिल्ह्य़ात पूर्वी ज्वारीचे क्षेत्र साडेतीन लाख हेक्टरवर होते, परंतु पाटपाणी आल्यानंतर शेतकरी उसाकडे वळल्याने, ज्वारीचे क्षेत्र काहीसे घटले आहे. काही ठिकाणी हुरडय़ाच्या माध्यमातून व्यावसायिकता जोपासली जात आहे. त्यासाठी खास ज्वारीची पेरणी केली जाते. जिल्ह्य़ाच्या उत्तर भागापेक्षा दक्षिण भागात ज्वारीचे क्षेत्र अधिक आहे. मात्र हुरडय़ाच्या कणसांना पाखरांचा त्रास जास्त जाणवतो. हुरडय़ाचे दाणे अधिक चवदार असतात. त्यामुळे पाखरांच्या थव्यापासून त्याला जपावे लागते.

शहरातील पर्यटकांना कृषिसंस्कृतीची ओळख होण्यासाठी हुरडा पार्टी हे एक चांगले माध्यम आहे. शेतकऱ्यांनीही त्यासाठी व्यावसायिकता आत्मसात करावी. हुरडा पार्टीच्या ठिकाणी घरगुती पदार्थाची विक्रीही चांगली होऊ शकते. महिला बचतगटांचे स्टॉलही त्या ठिकाणी लावता येतील. गुणवत्तेच्या आधारेच व्यावसायिक संबंध वृद्धिंगत होतील, हे लक्षात ठेवून याकडे शेतकऱ्यांनी पाहावे. हुरडा पार्टी उत्पन्नवाढीचे एक चांगले साधन आहे.

– हेमंत नलगे, उपसंचालक, कृषी विभाग, नगर

ग्रामीण संस्कृतीकडे शहरी लोक आकर्षित होऊ लागले आहेत. त्यासाठी शेतीच्या ठिकाणी काही बदल व सुविधा निर्माण केल्या आहेत. त्याचा चांगला उपयोग होत आहे. हुरडा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी असा तीन महिनेच असतो. शेतीमध्ये कुप्या उभारून नागरिकांना बसण्याची व्यवस्था केली आहे. ‘हुरडा महोत्सवा’सारखे काही उपक्रम आयोजित करून कृषी विभागाने हुरडय़ाच्या माध्यमातून कृषी पर्यटनाला चालना देण्याचे उपक्रम राबवण्याची आवश्यकता आहे.

– अनिल भांगे, खडका फाटा, नेवासा

पांजरापोळ गोरक्षण संस्था गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून हुरडा पार्टीचे आयोजन करते. यामुळे शहरातील युवकांना शेतीची माहिती मिळते. कुटुंबाला दिवसभर विरंगुळा मिळतो. संस्थेने केवळ हुरडय़ासाठी स्वत:ची ‘दुधमोगरा’ जात विकसित केली आहे.  हुरडय़ासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केला जातो. नियोजन करून हुरडय़ाचा हंगाम फेब्रुवारीपर्यंत चालेल या पद्धतीने पेरणीचे नियोजन संस्थेच्या २० एकर जागेत केले जाते. हुरडय़ाच्या हंगामात संस्थेला नियमित कामगारांशिवाय अतिरिक्त कामगारांची गरज भासते. त्यामुळे अनेकांना हंगामी रोजगारही उपलब्ध होतो.

– किशोर मुनोत, सचिव, पांजरापोळ गोरक्षण संस्था

निसर्गरम्य वातावरणासाठी झाडांची जोपासना केली आहे. परजिल्ह्य़ातील व्यावसायिकांच्या गटाला मुक्काम हवा असतो, परंतु त्याची व्यवस्था होऊ शकत नाही. दिवसभर विजेचाही प्रश्न जाणवतो. कृषी पर्यटनाला चालना द्यायची तर जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला हवे. हुरडा पार्टीच्या माध्यमातून पर्यटक परिसरातील धार्मिक-निसर्ग ठिकाणांना भेटी देत असतात. त्यामुळे व्यावसायिकांना हातभार लागतो आहे. इतर शेतकऱ्यांना हुरडय़ाची कणसे खरेदीची हमी देत त्यांना ज्वारीच्या पेरणीसाठी आम्ही प्रोत्साहनही देतो. त्यामुळे इतरांनाही खात्रीशीर उत्पन्न मिळते.

– बाळासाहेब मोहारे व दादासाहेब साबळे कोरेगाव, चिखली, श्रीगोंदे