ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी दुपारी प्रचार बंद

येथील नगरपालिका निवडणुकीत प्रचारातील ध्वनिप्रदूषणाने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत पंढरपूर शहर पोलिसांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बठकीत दुपारी १ ते ४ या दरम्यान ध्वनिक्षेपकावरील प्रचार बंद ठेवण्याचा सर्वपक्षीय निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर ध्वनिक्षेपकावरील प्रचार करताना आवाजाची कमाल पातळी ओलांडू नये अन्यथा संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद पोलीस प्रशासनाने दिली आहे.

पंढरपूर नगरपालिकेची रणधुमाळी सुरू असून नगराध्यक्ष पदासाठी ११ उमेदवार िरगणात आहेत. त्यांनी परवानगी घेतलेली ३३ वाहने तसेच नगरसेवक पदाच्या १५५ उमेदवारांनी परवानगी घेतलेली वाहने अशी एकत्रित २५८ वाहने पंढरपूर शहरातील ३४ वॉर्डातून फिरत आहेत. प्रचारासाठी प्रत्येक नगरसेवकपदाच्या उमेदवाराला दोन रिक्षा व नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांना तीन रिक्षा परवानगी देण्यात आली आहे. मात्र एकाच गल्लीत आणि बोळात एकाच वेळी तीन ते चार वाहने समोरासमोर येत आहेत आणि कर्णकर्कश आवाज करून प्रचार करीत आहेत. या आवाजामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिक प्रचंड हैराण झालेले आहेत. लहान मुले, वृद्ध नागरिक, रुग्णालयातील पेशंट, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय कार्यालयातील कामकाज या सर्व घटकांवर या प्रचाराचा विपरीत परिणाम होत आहे.

यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल िपगळे यांनी शहरातील सर्वच राजकीय पक्ष, निवडणूक पॅनेल प्रमुखांची बठक बोलावली. निवडणूक प्रचार करणाऱ्या सर्व वाहनांना रीतसर परवानगी दिलेली आहे. त्यामुळे ती बंद करणे योग्य नाही. मात्र या वाहनांनी आवाजाची कमाल पातळी ओलांडू नये. तसे आढळून आल्यास संबंधित वाहनावर कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल िपगळे यांनी सांगितले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास भाळवणकर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव,  रणजित पाटील, शहर पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्यासह सर्व पक्षाचे प्रमुख उपस्थित होते.