News Flash

जाहिरातबाज मोदींकडून जनतेची दिशाभूल- मुख्यमंत्री

एकसंघ भारतात फूट पाडून छोटी राज्ये करून त्यातून देश दुबळा करण्याचा सुनियोजित कट भाजपकडून सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी

| August 19, 2013 02:34 am

एकसंघ भारतात फूट पाडून छोटी राज्ये करून त्यातून देश दुबळा करण्याचा सुनियोजित कट भाजपकडून सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी लोणावळ्यात केला. झारखंड व छत्तीसगडसारखी छोटी राज्ये तयार झाली. मात्र, ती नक्षलवाद्यांच्या हातात गेली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. जाहिरातबाजी, आश्वासने अशी ‘गोबल्स’नीती वापरून आणि प्रसारमाध्यमांमध्ये वारेमाप पैसा खर्च करून नागरिकांची दिशाभूल करण्याचे तंत्र गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सध्या वापरत आहेत. मात्र, देशाची जनता जाहिरातबाजीला भुलणार नाही, असेही ते म्हणाले.
प्रदेश महिला काँग्रेसच्या लोणावळा येथील प्रशिक्षण शिबिरात मुख्यमंत्री बोलत होते. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘२०१४’ साठी भाजपने कंबर कसली. मात्र, त्यांचे जुने प्रचलित नेते संपले. त्यामुळे मोदींना पुढे आणण्यात आले. भाजपने नेहमीच धार्मिक आघाडीवर फूट पाडण्याचे काम केले आहे. देशाची सत्ता उपभोगण्याची संधी जनतेने भाजपला दिली. कर्नाटक व महाराष्ट्रातही भाजप सत्तेत होता. मात्र, जनतेने टाकलेला विश्वास त्यांना सार्थ ठरवता आला नाही. त्यांच्या निराशाजनक कामगिरीमुळेच काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली. काँग्रेसने देशाला एकसंघ ठेवले. मात्र, काँग्रेसला हटवून देश दुबळा करण्याचा सुनियोजित कट आहे. देशात फूट पाडणाऱ्या व देशाचे तुकडे करू पाहणाऱ्या भाजपसारख्या प्रवृत्ती व त्यांचे समर्थन करणाऱ्या परदेशी ‘पीआर’ कंपन्यांना शह देण्याशिवाय पर्याय नाही व त्यासाठी काँग्रेस हाच समर्थ पर्याय आहे.
मोठय़ा देशांना भारताची बाजारपेठ काबीज करायची आहे. त्यासाठी स्वत:ची ताकद असलेले सरकार त्यांना भारतात नको आहे. त्याऐवजी दुबळे सरकार व छोटी-छोटी राज्ये असावीत. कारण ते प्रभावीपणे काम करू शकत नाहीत आणि त्यांना सांभाळणे सोपे असते. अनेक बलाढय़ देशांचे तुकडे झाले. भारतासारखे मजबूत राष्ट्र एकसंघ राहिल्यास पाश्चिमात्य देशांच्या अर्थकारणावर वेगळा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेरील देश, संस्था, भांडवलदारांचा देशाला दुबळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. धर्म, जात, भाषेवरून सुरू असलेले राजकारण त्यांच्या हेतूस उपयुक्त ठरेल, असेच आहे. हिंदूुत्वाचा अजेंडा पाकिस्तान व भारतविरोधी राष्ट्रांना फायदेशीर आहे. येथील अंतर्गत वादाचा फायदा घेण्याचे त्यांचे इरादे आहेत. मात्र, काँग्रेस हरल्याशिवाय असले मनसुबे पूर्ण होणार नाहीत. दुबळे सरकार, १०-१५ पक्षांच्या जोडणीचे सरकार, त्यांचा दुबळा पंतप्रधान, कोणती खाती कोणाकडे यावरून वाद किंवा दर सहा महिन्यांनी निवडणूक यातून देशाचे विघटन करण्याचा डाव आहे. त्यात परदेशी कंपन्या आघाडीवर आहे. देशाला खिचडी सरकार नको आहे. पंतप्रधानाची वाटणी झाल्याचे चित्र भूषणावह नाही, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र सर्वाधिक श्रीमंत राज्य
गुजरातच्या विकासाचा उगीचच डंका वाजवला जात आहे. महाराष्ट्र उत्पन्नाच्या बाबतीत सर्वाधिक श्रीमंत राज्य आहे. २००२ ते २०१२ पर्यंतच्या काळात भारतात झालेल्या परकीय गुंतवणुकीपैकी ३९ टक्के गुंतवणूक एकटय़ा महाराष्ट्रात झाली असून अवघी दोन टक्के गुजरातमध्ये झाली आहे. महाराष्ट्राच्या जवळपासही गुजरात नाही, हे दाखवणारी आकडेवारी आपण नरेंद्र मोदींना सांगणार आहोत, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी नमूद केले. १५ ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधानांवर टीका करणारे भाषण मोदींनी केले. हा अतिशय निंदनीय प्रकार असून व्यवस्थेला छेद देण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 2:34 am

Web Title: propogandic modi missleading country cm pruthviraj chavan
Next Stories
1 हॉस्टेलमधील विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
2 ‘पवारांकडून समाजाचा विश्वासघात!’
3 बर्वे पदमुक्तीमागे जातीय शक्तींचा हात?
Just Now!
X