महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून गेल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. विज्ञान विषयाच्या प्रात्यक्षिक परीक्षेत विद्यार्थ्यांना शून्य ते एक असे गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांनी शंका उपस्थित केली होती. त्यामुळे विद्यार्थांनी गेल्या काही दिवसांपासून बोर्डाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडलं होते. त्यांच्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. आज सोमवारी परीक्षा मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षेत मिळालेल्या गुणांची झेरॉक्स कॉपी देण्याचे लेखी आदेश दिले आहेत. तसेच १४ जूनपर्यंत रिचेकिंगचा रिझल्टही विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पेपर चेकिंग आणि प्रात्यक्षिक परीक्षेतील गुणांमध्ये घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला होता. बारावीच्या निकालात विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये कमी गुण मिळाले असल्याने त्यांना प्रवेश परीक्षांमार्फत इंजिनीअरिंग, मेडिकलला प्रवेश घेता येत नसल्याचे समोर आले आहे. तर, अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

आंदोलनाची तीव्रता पाहता बोर्डाने बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गुणांची झेरॉक्स कॉपी संबंधित विद्यार्थ्याला देण्याचे लेखी आदेश दिले आहे. पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना सुट्टीच्या काळात परत येण्याची विनंती बोर्डाकडून करण्यात येणार आहे.

देशात आणि राज्यात विविध ठिकाणी इंजिनीअरिंग, फार्मसी, मेडिकल अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी गणित, जीवशास्त्र भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये किमान ५० टक्के गुण आवश्यक आहे. अशा वेळी विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले आहेत.