महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस व विजय फाउंडेशन आयोजित पु.ल.देशपांडे महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेस ८ नोव्हेंबरपासून राज्यात प्रारंभ होत असून, या स्पर्धा औरंगाबाद, पुणे, अमरावती, मुंबई आणि नाशिक अशा पाच विभागांत घेण्यात येणार आहेत. यावर्षी प्रथमच स्पर्धेची अंतिम फेरी नाशिक येथे घेण्यात येणार असून, यावर्षीपासून दिग्गज कलाकारांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धेचे निमंत्रक व माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व आमदार विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
मोहिते-पाटील म्हणाले, या स्पर्धांची प्राथमिक फेरी पुणे, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व मुंबई अशा पाच विभागांमधून घेतली जाते. पुणे विभागात पश्‍चिम महाराष्ट्रातील संघ, अमरावती विभागात विदर्भातील संघ, नाशिक विभागात उत्तर महाराष्ट्रातील संघ, औरंगाबाद विभागात मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यातील संघ व मुंबई विभागात मुंबई महानगरासह नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघांना प्रवेश दिला जातो. या स्पर्धेची अंतिम फेरी यावर्षी प्रथमच नाशिक येथे घेण्यात येणार आहे. दरवर्षी या स्पर्धेस प्रचंड प्रतिसाद मिळत असून, स्पर्धेचे हे नववे वर्ष असल्याचे ते म्हणाले.
यावर्षी औरंगाबाद विभागाच्या स्पर्धा ८ व ९ नोव्हेंबर रोजी तापडिया रंगमंदिर, पुणे विभागाच्या स्पर्धा ११, १२ व १३ नोव्हेंबर रोजी भरत नाट्यमंदिर, अमरावती विभागाच्या स्पर्धा १६ व १७ नोव्हेंबर रोजी श्री संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवन, मुंबई विभागाच्या स्पर्धा ४ व ५ डिसेंबर रोजी रविंद्र नाट्य मंदिर येथे तर नाशिक विभागाच्या स्पर्धा ५ व ६ डिसेंबर रोजी कालिदास रंगमंदिर येथे घेण्यात येणार आहेत.
पुणे, अमरावती, नाशिक, औरंगाबाद व मुंबई अशा पाच विभागांमधून प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या एकांकिकांना अंतिम फेरीत प्रवेश देण्यात येतो. अंतिम फेरीची स्पर्धा नाशिक येथील कालिदास रंगमंदिर येथे ७ व ८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असून, या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक रू.५१,००० व पु.ल.देशपांडे महाकरंडक, द्वितीय क्रमांक रू.३१,००० व स्मृतीचषक, तृतीय क्रमांक रू.२१,००० व स्मृतीचषक तसेच सर्वोत्कृष्ट अभिनय स्त्री, पुरूष, बालकलाकार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, लेखक, नेपथ्य, संगीत, प्रकाश योजना, वेशभूषा याकरिता रू.१००० अशी वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.