शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी राज्य सरकारकडे एक महिन्याचे मानधन जमा करणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी हा निर्णय घेतला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी शेतमालाला हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि कर्जमाफी अशा विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सत्तेत असलेल्या शिवसेनेनही कर्जमाफीच्या मागणीवरुन भाजपवर दबाव टाकला होता. शेवटी आंदोलनापुढे नमते घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली होती. कर्जमाफीच्या निर्णयामुळे राज्य सरकारवर सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार असून ६०-७० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापनदिन सोहळ्यात स्पष्ट केले होते. कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधींना त्यांचे एक महिन्याचे मानधन राज्य सरकारकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. यानुसार शिवसेनेचे लोकप्रतिनिधी त्यांचे मानधन सरकारकडे जमा करणार आहेत.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचं एका दिवसाचं वेतन द्यावं, असं आवाहन राज्य सरकारनं केल्याच गुरुवारी समोर आलं होतं. मात्र, ही मदत ऐच्छिक आहे, असे सरकारने स्पष्ट केले होते.