02 March 2021

News Flash

“महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या ‘भाज्यपालां’नी हे समजून घेतले पाहिजे”

शिवसेनेने भाजपा व राज्यपालांवर डागले टीकेचे बाण

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. (संग्रहित छायाचित्र)

राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचे पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाल्याचा दावा करत शिवसेनेनं महाराष्ट्रातील भाजपा नेते व राज्यपालांवर टीकेचे बाण डागले आहेत. मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात करू, असं काही भाजपा पुढाऱ्यांनी जाहीर केल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला असून, यावरून शिवसेनेनं राज्यपालांवरही निशाणा साधला आहे.

पद्दुचेरीत झालेल्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसचं सरकार कोसळलं. पद्दुचेरीतील या राजकीय भूंकपावरून शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि राज्यपालांवर टीकास्त्र डागलं आहे. “पुद्दुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे. मुख्यमंत्री नारायणसामी यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पाच आमदारांनी बेडुकउड्या मारल्याने सामी यांचे सरकार अल्पमतात आले. पाच आमदारांनी साडेचार वर्षांपर्यंत काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यात अण्णा द्रमुकचे आमदारही होते, पण आता हे सर्व आमदार कमळफुलाचे भुंगे बनले आहेत. विधानसभा चारेक महिन्यांत लागतील. तोपर्यंत भाजपा किंवा केंद्र सरकारला थांबता आले असते, पण येथेही सरकार पाडून दाखवले असा टेंभा मिरवायला भाजपा मोकळा झाला. पुद्दुचेरीतले सरकार पाडून दाखवले, आता मार्च-एप्रिल महिन्यात महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’ला सुरुवात करू, असे काही भाजपा पुढाऱ्यांनी जाहीर केले,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“पुद्दुचेरीत सरकार पाडण्यासाठी ज्या खटपटी व लटपटी झाल्या ते सर्व प्रयोग महाराष्ट्रातही करून झाले. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी सामी यांच्या सरकारला धड काम करू दिले नाही. हे राज्य केंद्रशासित असल्याने तेथील राज्यपालांना जरा जास्तच अधिकार असतात. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला लोकहिताचा प्रत्येक निर्णय किरण बेदी फिरवू लागल्या. अर्थात, दिल्लीचे आदेश असल्याशिवाय नायब राज्यपाल असे वागणार नाहीत. राज्यपाल महाराष्ट्राचे असोत नाहीतर पुद्दुचेरीचे, त्यांना दिल्लीचे आदेश पाळूनच उठाठेवी करायच्या असतात. राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो. किरण बेदी यांनाही कढीपत्त्याप्रमाणे वापरून फेकून दिले आहे, हे महाराष्ट्रात फोडणी देणाऱ्या ‘भाज्यपालां’नी समजून घेतले पाहिजे. केंद्रीय सत्तेचा वापर करून विरोधकांची राज्यांतील सरकारे पाडायची हे सध्या काही जणांना शौर्य वगैरे वाटत असेल तर ते चूक आहे,” अशा शब्दात शिवसेनेनं राज्यपालांवर निशाणा साधला आहे.

“आता महाराष्ट्र’ असे स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी…”

“महाराष्ट्रात नेमके हेच सुरू असल्याने पुद्दुचेरीत जे घडले त्यावर विश्वास ठेवावाच लागेल. एकेकाळी दक्षिणेत काँग्रेसचा बोलबाला होता. आज पुद्दुचेरीसारखे लहान राज्यही त्यांच्या हाती उरले नाही. देशात आता पंजाब, राजस्थान व छत्तीसगढ येथेच काँग्रेसची सरकारे उरली आहेत. महाराष्ट्र व झारखंडमध्ये आघाडी सरकारात काँग्रेस सामील आहे. झारखंडही अस्थिर केले जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला गेला आहे. हे वातावरण लोकशाहीला मारक आहे. तत्त्व आणि नीतिमत्ता गुंडाळून फक्त सत्ता मिळविण्यासाठी जे राजकारण सुरू आहे ते चिंताजनक आहे. प. बंगालपासून पुद्दुचेरीपर्यंत, महाराष्ट्रापासून जम्मू-कश्मीरपर्यंत दलबदलूंसाठी लाल गालिचे अंथरायचे व राजकीय कळसूत्र्यांचा खेळ चालवायचा हे कुणालाच शोभणारे नाही. ‘पुद्दुचेरी झाले, आता महाराष्ट्र’ असे स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर त्यांनी स्वप्नातच राहावे. महाराष्ट्राने घेतलेला निकाल हेच जनमानस आहे. त्यात बदल होणार नाही. महाराष्ट्राचे मन खंबीर आहे, इरादे पक्के आहेत. मध्य प्रदेश, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाहीत. शेवटी राजकारणातील एक मंत्र महत्त्वाचा, तो सगळ्यांनाच लागू पडतो. ‘जे पेराल तेच उगवेल’ याचे भान प्रत्येक राज्यकर्त्याने ठेवले तर बरे!,” असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 7:40 am

Web Title: puducherry political crisis shivsena slams bjp and governor saamana editorial bmh 90
Next Stories
1 रुग्णवाढीची चिंता
2 पालघर जिल्ह्यातील १४ हजार शिक्षक वेतनाच्या प्रतीक्षेत
3 ८० कोटींचे वीज देयकप्रकरणी लिपिक निलंबित
Just Now!
X