विश्व हिंदू परिषदेच्या 200 ते 250 कार्यकर्त्यांसह अध्यक्ष, जिल्हा कार्यध्यक्ष आणि जिल्हा मंत्री यांच्यावर शोभा यात्रेत विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शोभा यात्रेत चार ते पाच मुलींच्या हातात एअर रायफल असल्याचे निदर्शनात आले होते. पिंपरी चिंचवडच्या निगडी पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी(दि.3) संध्याकाळी 5 ते रात्री 10च्या दरम्यान यमुनानगर येथे अंकुश चौक ते ठाकरे मैदानदरम्यान शोभा यात्रा काढण्यात आली होती. शहरातील 200 ते 250 कार्यकर्त्यांसह विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष शरद इनामदार, जिल्हा कार्यध्यक्ष धनाजी शिंदे, जिल्हा मंत्री नितीन वाटकर हे देखील शोभा यात्रेत सहभागी झालेले होते. यावेळी चार मुलींच्या हातामध्ये एअर रायफल होती, आणि ती रायफल हवेत चालवण्यात आली. एअर रायफलचे ट्रिगर दाबल्याने मोठा आवाज झाला. याशिवाय पाच मुलींच्या हातात तलवारी होत्या आणि त्या तलवारी घेऊन शोभा यात्रेत मिरवत होत्या. कार्यकर्त्यांनी सोटे, भाले, तलवारी, दांडके, बंदुका हातात बाळगल्या, असं फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी निगडी पोलिसांत 200 ते 250 कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांवर विनापरवाना हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.