पालघर : डहाणू तालुक्यातील वनविभागामध्ये असलेल्या टेकडी परिसरातून बेकायदा माती उत्खनन करून टेकडीचे सपाटीकरण केल्याप्रकरणी डहाणूच्या तहसीलदारांनी उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांना  सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

वनविभागाच्या ताब्यात असलेल्या टेकडीच्या भागात तसेच काही गुरुचरण व खासगी जागेत काही ठेकेदारांनी माती- मुरुम विनापरवाना उत्खनन करून  टाळेबंदीच्या काळात विविध ठिकाणी वाहतूक केली. १५ ते २० टन वजनाचे डम्पर या मार्गाने जात असल्याने वनई ग्रामपंचायत ते आंबतपाडा व  तांबळपाडा तसेच वाणीपाडा (पाटाच्या भागापासून) खंबाळे व पुढे मुख्य रस्त्यापर्यंत या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.

वनईच्या भागात असलेली टेकडीचे सपाटीकरण करताना त्या ठिकाणी निघालेल्या मोठय़ा दगडांची चोरीदेखील काही स्थानिक मंडळींनी केली असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.

सुमारे पाच ते सहा हजार ब्रास मुरुम-मातीची चोरी केली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असताना महसूल विभागाने साडेतीन हजार ब्रास विनापरवाना माती उत्खनन केल्याप्रकरणी  दोन कोटी रुपयांचा दंड  सहा ठिकाणी विनापरवाना उत्खनन केले गेले असताना दोन ठिकाणच्या चोरीविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे प्राथमिकरीत्या दिसून येत आहे.

विशेष म्हणजे यासंदर्भात लोकसत्तामध्ये ३ जून रोजी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्याने संपूर्ण उत्खननाची माहिती देण्याऐवजी मोजकी ठिकाणे दाखविल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात आले.

टाळेबंदीचा लाभ घेत जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी बेकायदा उत्खनन केल्याच्या प्रकार घडले आहेत. मात्र महसूल यंत्रणा करोना संक्रमणाच्या कामात व्यस्त असल्याचे कारण सांगत त्यांच्याविरुद्ध कारवाई नरमाईचे धोरण अवलंबिले जात असल्याचे आरोप होत आहेत.