उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये माझेही नाव घेतले जात आहे. पण, आता मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ इच्छित नाही, अशी भूमिका ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे यांनी घेतली आहे.

९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक साहित्यिकांच्या नावांची चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे. यात ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोरोडे यांच्या नावाचाही उल्लेख केला जात आहे. त्यावर बोराडे यांनी पत्रक काढून अध्यक्षपदाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

‘साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांतून संभाव्य नावे चर्चिली जात आहेत, त्यात माझं एक नाव आहे. यासंदर्भात मी स्पष्ट करू इच्छितो, की साहित्य संमेलन तीन दिवसांचे असले तरी अध्यक्षाचा कार्यकाळ एक वर्षाचा असतो. या कार्यकाळात त्या अध्यक्षाने मराठी भाषा व मराठी साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी प्रयत्न करणे अपेक्षित असते. मात्र मोजक्याच अध्यक्षांनी यापूर्वी हे कार्य केले आहे.
ऐन उमेदीच्या वयात मला हा सन्मान प्रदान झाला असता, तर हे कार्य मी माझ्या कुवतीनुसार निश्चिच चांगले केले असते. पण वयोमानानुसार ती उमेद राहिलेली नाही. त्यामुळे उस्मानाबाद येथे आयोजित होत असलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचा मी अध्यक्ष होऊ इच्छित नाही. इतकेच नव्हे, तर तह्ह्यात मला हा सन्मान स्वीकारणे शक्य होईल असे वाटत नाही, असे स्पष्ट मत त्यांनी पत्रकातून मांडले आहे.’