12 November 2019

News Flash

केंद्राचा निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा

पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या नावाचे तिकीट केंद्र सरकारने काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा आहे

राधाकृष्ण विखे पाटील (संग्रहित छायाचित्र)

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्या असीम त्यागाचे प्रतीक म्हणून त्यांच्या नावाचे तिकीट सरकारने प्रकाशित केले होते. परंतु सध्याच्या केंद्र सरकारने ही तिकिटे काढून टाकण्याचा घेतलेला निर्णय लोकशाहीला काळिमा फासणारा व निषेधार्ह आहे. सरकारचे सर्वच पातळीवरील अपयश वाढू लागल्याने क्षुद्र मानसिकतेतून असे निर्णय सरकार घेत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
स्वातंत्र्यानंतर देशात विरोधी पक्षांचीही सरकारे आली, मात्र एवढा संकुचितपणा व द्वेषभावना कधी कोणत्या सरकारने दाखवली नाही. केंद्र सरकारने श्यामाप्रसाद मुखर्जी व मदनमोहन मालवीय यांना भारतरत्न प्रदान केले, परंतु काँग्रेसने कधी त्याला आक्षेप घेतला नाही, याकडे विखे यांनी लक्ष वेधले.
इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशासाठी केलेल्या बलिदानाची दखल घेतच सरकारने त्यांचे तिकीट प्रकाशित केले होते. हा त्यांचा व्यक्तिगत सन्मान नव्हता, तर त्यांनी देशाच्या अखंडत्वासाठी योगदान दिल्याच्या लोकांच्या भावनांचे प्रतीक होते. त्यासाठीच दोघांना भारतरत्न प्रदान करण्यात आले होते. देशाच्या उभारणीत ज्यांचे योगदान आहे, अशा कोणाबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु सध्याच्या सरकारची मानसिकता काय आहे हेच या निर्णयातून दिसते, असे सांगताना विखे यांनी केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन केले.
सध्याचे केंद्र सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरताना दिसत आहे, म्हणूनच असे निर्णय घेत आहे, असा आरोप त्यांनी केला.

First Published on September 16, 2015 3:45 am

Web Title: radhakrishna vikhe criticises govt about postal ticket over indira gandhi and rajeev gandhi