सर्व किनाऱ्यांवर समुद्रात ‘फ्लोटींग बोयाज’

रायगड जिल्ह्यतील प्रमुख समुद्र किनाऱ्यांचा आंतराष्ट्रीय मानकांनुसार विकास करण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून समुदकिनारे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात पर्यटकांच्या बचावासाठी लाईफ जॅकेट आणि बचाव साहित्याचे वितरण करण्यात आले होते. आता समुद्रकिनाऱ्यावर धोक्याची सूचना देणारे फ्लोटींग बोयाज बसवण्याचे काम सुरु झाले आहे. जिल्हा नियोजन समित्यांच्या नाविन्यपूर्ण योजनेतून ५ लाख २० हजार रुपयांचा निधी यासाठी खर्च केला जाणार आहे.

रायगड जिल्हा दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. निळाशार समुद्र, विस्तिर्ण पसरलेले किनारे,  नारळ सुपारीचा बागा याचे त्यांना अप्रुप राहिले आहे. मात्र भरती, ओहोटी आणि पाण्यातील अंतर्गत प्रवाहांचा अंदाज न आल्याने जिल्ह्यत समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांचे जीव धोक्यात येण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी यांनी समुद्र किनाऱ्यांवरील सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून विशेष प्रयत्न सुरु केले आहे. आंतरराष्ट्रीय निकषानुसार समुद्र किनारे विकसित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींना सोबत घेऊन निरनिराळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. नियमित बठका घेऊन या संदर्भात आराखडे तयार करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जीवरक्षकांसाठी उपयुक्त असणाऱ्या साहित्याचे वितरण करण्यात आले. आता दुसऱ्या टप्प्यात किनाऱ्यावर पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र निश्चित केले जाणार आहे.   पर्यटकांना समुद्रात पोहण्यासाठी सुरक्षित हद्दीची कल्पना यावी, हा यामागचा मुळ उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात मुरुड आणि काशिद येथे फ्लोटिंग बोयाज बसवण्यात आले असून येत्या काही दिवसांत जिल्ह्यतील सर्व प्रमुख समुद्र किनाऱ्यावर हे फ्लोटींग बोयाज बसविले जाणार आहेत. यात नागाव, आक्षी, काशिद, मुरुड, अलिबाग, वरसोली, मांदवा, हरेश्वर, किहिम, रेवदंडा, कोर्लई या प्रमुख समुद्र किनाऱ्यांचा समावेष आहे. समुद्रात पोहण्याचे सुरक्षित क्षेत्र दर्शविणे तसेच धोकादायक पातळी दर्शविण्यासाठी याचा वापर होतो.

काठापासून साधारणत: ५० ते ६० मिटर अंतरावर किंवा भरती ओहटीच्या पातळ्यांचा अभ्यास करुन व स्थानिकाच्या अनुभवाच्या आधारे ही ठिकाणे निश्चित करण्यात येतात. त्यावर हे बोयाज लावण्याचे काम सुरु आहे.

एक बोयाज म्हणजे एक मोठा चेंडू असतो तो पाण्यावर तरंगतो. त्याला वर एक निशाणी पताका लावलेली असते. खाली किमान १० मिटर लांबीच्या दोरखंडाला तो बांधून त्याला खालच्या बाजूला दीड फुट रुंद आणि दोन फुट लांब अशी सिमेंटची प्लेट लावलेली असते. त्यामुळे फ्लोटींग बोयाज पाण्यात स्थिर राहतो. हे बोयाज खालून एकमेकांना दोरखंडाने बांधलेले असल्याने  ते नेहमी एका रेषेत राहू शकतात. त्यावरुनच पोहणाऱ्यांना सुरक्षित हद्द ओळखता येते. जिल्ह्यत ११५ बोयाज बसविण्यात येत आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा उपयुक्त उपक्रम असून यामुळे पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे.

पर्यटकांना आवाहन

जिल्ह्यत येणाऱ्या पर्यटकांनाही जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे की, बीचनिहाय भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने साधारणपणे साडेतीन फूट खोलीच्या पुढे समुद्रात पोहण्यासाठी जाऊ नये. मद्यपान करून पोहू नये. जीव धोक्यात घालून आनंद घेण्याचा प्रयत्न करू नये, आपली स्वतची जबाबदारी ओळखून समुद्रात पोहण्यासाठी उतरावे. प्रशासनाने प्रत्येक बीचवर लावलेल्या सुरक्षा सुचना व स्थानिक नागरिकांनी दिलेल्या सूचनांकडे लक्ष द्यावे.

मेरीटाईम बोर्ड आणि जागतिक बँकेच्या मदतीने मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या विसाव्यासाठी लाकडी विसावा केंद्रांची उभारणी केली जात आहे. जिल्ह्यत प्रथमच अशा पद्धतीच्या झोपल्यांची उभारणी होणार आहे. या शिवाय किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी क्रश मशिन्सही उपलब्ध करून दिले जाणार आहे.