21 November 2019

News Flash

रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिलांसाठी राखीव

शेकापच्या सुप्रिया पाटील या रायगड जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष ठरल्या.

मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण आज मुंबईत जाहीर झाले. गुडघ्याला बािशग बांधून तयार असलेल्या उमेदवारांची संधी हुकली असून सर्वसाधारण प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी अध्यक्षपद आरक्षित झाले आहे. त्यामुळे इच्छुक महिला उमेदवारांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. १९६२ मध्ये रायगड जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक झाली. दादासाहेब लिमये यांना पहिले अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. त्यानंतर २०१२ पर्यंत झालेल्या निवडणुकीतून चार वेळा विविध पक्षांच्या महिला उमेदवारांना अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळण्याचा मान मिळाला. यामध्ये शेकापच्या सुप्रिया पाटील या रायगड जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष ठरल्या. त्यानंतर शिवसेनेच्या अपेक्षा कारेकर, शेकापच्या नीलिमा पाटील आणि आरपीआयच्या कविता गायकवाड या महिला सदस्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर होणाऱ्या अध्यक्षपदासाठी आज मुंबईत आरक्षण जाहीर झाले. याकडे जिल्हय़ातील सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. रायगड जिल्हा परिषदेचे आरक्षण महिलांसाठी जाहीर झाले असून ते अडीच वर्षांसाठी असेल. त्यामुळे मार्च २०१७ला होणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गातील कोणती महिला अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसणार? याची चर्चा आता जिल्हय़ाच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र त्याच वेळी गुडघ्याला बािशग बांधून बसलेल्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील वेळेपासून ५० टक्के महिलांना निवडून येण्याची संधी मिळाली. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमध्ये महिला सदस्यांची संख्या आपोआपच वाढली आहे. पर्यायाने अध्यक्षपदासाठी महिलांमध्ये या वेळी रस्सीखेच होण्याची दाट शक्यता आहे. रायगड जिल्हा परिषदेत सध्या शेकाप राष्ट्रवादी युती सत्तेत आहे. आगामी निवडणुकीसाठी कोणते पक्ष एकत्र येतात आणि कुणाला किती यश मिळते यावर पुढील अध्यक्षपदी कोण महिला विराजमान होणार हे अवलंबून असणार आहे.

First Published on June 14, 2016 2:08 am

Web Title: raigad district zilla parishad president post reserved for women
टॅग Women
Just Now!
X