|| प्रसेनजीत इंगळे

चर्चगेट-डहाणू स्थानकांदरम्यान केवळ दोन कर्मचारी उपलब्ध; अपघातांतील जखमींची फरफट सुरूच : – ‘ऑनडय़ूटी स्ट्रेचर हमाल, कृपया स्टेशन मास्तरांच्या कार्यालयात निघून यावे..’ अनेकदा रेल्वे स्थानकांवर अशा प्रकारची उद्घोषणा केली जाते. मात्र पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू या स्थानकांदरम्यान स्ट्रेचर आणि अधिकृत हमालच नसल्याची माहिती समोर आली आहे. या मार्गावर केवळ दोन स्ट्रेचर आणि दोन हमाल उपलब्ध आहेत. वैतरणा, सफाळे यांसारख्या स्थानकांत तर हे काम करण्यासाठी कुणीही पुढे येत नसल्याची माहिती प्रवासी संघटनांनी दिली.

रंगरंगोटी, फलाटांचे रुंदीकरण, सरकते जिने, नवीन इंडिकेटर, तिकीटघर, मोबाइल अ‍ॅप आदी सुधारणांमुळे अनेक रेल्वेस्थानकांनी कात टाकली आहे. परंतु आजही आवश्यक सेवा दुर्लक्षित राहिल्या आहेत. आधुनिक सोई-सुविधांवर कोटय़वधी खर्च करणारे रेल्वे प्रशासन मात्र अपघातांमध्ये जखमींना सेवा देताना अपयशी ठरले आहे. कारण अपघातांत जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयांत दाखल करण्यासाठी लागणारे स्ट्रेचर आणि अधिकृत हमाल नसल्याने जखमींची फरफट सुरू आहे.

सप्टेंबर महिन्यात विरार ते वैतरणा दरम्यान एका रेल्वे अपघातात जखमी झालेल्या युवकाला स्ट्रेचर वेळेवर न मिळाल्याने जीव गमवावा लागला होता. या घटनेने रेल्वे स्थानकातील सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. रेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार चर्चगेट ते डहाणू दरम्यान ३७ स्थानके आहेत. मात्र या मार्गावर किमान २ स्ट्रेचर आणि २ हमाल उपलब्ध आहेत. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते डहाणू रेल्वे स्थानकांत शासकीय हमाल उपलब्ध नाहीत. अपघात झाल्यास अपघाताच्या ठिकाणी जाण्यासाठी अधिकृत हमाल नसल्याने हमालाची शोधाशोध करून हमाल मिळवावे लागतात. यामुळे जखमींना मदत मिळण्यास विलंब होतो. वेळेवर मदत न मिळाल्याने अनेकांना जिवाला मुकावे लागले आहे.

मद्यपी, गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा आधार

रेल्वे स्थानकात स्ट्रेचर आणि हमालाची कमतरता असल्याने अपघाताच्यावेळी हमाल उपलब्ध न झाल्यास स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांना मद्यपी, गुर्दुल्ले आणि भिकाऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. कधी कधी स्थानकात साफसफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे हे काम सोपवले जाते. हे खाजगी हमाल शासकीय दरापेक्षा अधिक पैसे घेऊन काम करतात. याचा फटका स्थानिक अधिकाऱ्यांना अथवा जखमींच्या नातेवाईकांना बसतो. यामुळे या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात.

प्रत्येक स्थानकात हमालांची सोय करण्यात आली आहे. स्टेशन मास्तर, रेल्वे सुरक्षा बलाला या संदर्भात अधिकार दिले आहेत. ते आवश्यकता असल्यास बाहेरून शासकीय दराने सेवा घेऊ  शकतात. – रविंद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

रेल्वे अपघातांचे प्रमाण वाढत असताना प्रत्येक स्थानकात केवळ दोन ते तीन हमाल आणि स्ट्रेचर असणे मोठी शोकांतिका आहे. अनेक वेळा मागणी करूनही या सुविधा वाढवल्या जात नाही.

विजय शेट्टी, सदस्य, रेल्वे प्रवासी संघटना