मृग नक्षत्रातील पहिल्या पावसाचे सोमवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास शहरासह परिसरात जोरदार आगमन झाले. जोराच्या वाऱ्यासह वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ हा पाऊस बरसला. त्यामुळे यंदा पाऊस वेळेवर येईल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत. या पावसामुळे गेले काही दिवस असह्य़ उष्म्याने हैराण झालेल्या बीडवासीयांना आल्हाददायक दिलासा मिळाला.
जिल्हय़ात सायंकाळी कमी-अधिक स्वरुपात हा पाऊस झाला. दि. ७ जूनपासून मृग नक्षत्र सुरू होताच शेतकरी पावसाची वाट पाहतात. या वर्षी दुष्काळाच्या चटक्यातून सावरलेल्या शेतकऱ्याची यंदा तरी पाऊस वेळेवर येईल का, याची प्रतीक्षा आहे. मृग निघाल्यानंतर तीनच दिवसांनी पावसाचे चांगले आगमन झाल्याने शेतकरी सुखावला. बाजारातून बी-बियाणे खरेदी करून खरिपाच्या पेरणीची लगबग आता सुरू होईल. चांगला पाऊस होऊन जमिनीत ओल झाल्यानंतर पेरणीला सुरुवात करण्याच्या प्रतीक्षेत बळीराजा आहे.