मे महिन्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने लातूरकरांना त्रस्त केले. मंगळवारी सायंकाळी पाचपासूनच सोसायटय़ाचा वारा सुरू झाला. त्यामुळे विजेच्या तारा तुटणे, घरावरील पत्रे उडून जाणे व झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडले.
जळकोट व रेणापूरवासीयांना गारांचा मारा सहन करावा लागला. अहमदपूर तालुक्यातील खंडाळी गावात ३१, तर निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथे ३८ मिमी पावसाची नोंद झाली. निलंगा शहरात २३, अहमदपूर शहरात २४, तर तालुक्यात १३.५०, निलंगा तालुक्यात १३, चाकूर ८.४०, लातूर ३.७५, शिरूर अनंतपाळ ४.३३, तर औसा तालुक्यात २.८६ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाची आकडेवारी कमी असली, तरी वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जनावरांच्या निवाऱ्यासाठी शेतात टाकलेले पत्रे उडून गेले. बुधवारी सकाळी हे पत्रे शोधण्यासाठी शेतकऱ्यांना शिवारात भटकंती करावी लागली. काही गावांमध्ये शेतात पावसाळय़ासारखे पावसाचे पाणी जमा झाले. शेतीचे बांध फुटून मातीही वाहून गेली. सतत होणाऱ्या पावसामुळे शासकीय यंत्रणाही त्रस्त झाली. शेतीच्या नुकसानीचे मार्च महिन्यातच पंचनामे झाले असल्यामुळे वीज पडून कोणी दगावले तरच त्याची नोंद घेतली जाते. एरवी झाडे उन्मळून पडणे याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही.
लातूर शहरात पालिकेच्या इमारतीसमोरील झाडाची फांदी रस्त्यावर पडल्यामुळे काही काळ खोळंबा झाला. लातूरच्या साळेगल्लीत घरावर झाड कोसळल्यामुळे िभतीचे व पत्र्याचेही नुकसान झाले. शहराच्या िरग रोड वस्तीत झाडे पडली. बसवेश्वर चौकात अनधिकृत लावलेला फलक महावितरणच्या जनित्रावर पडल्यामुळे हे जनित्र बंद पडले. सुमारे तासभर जिल्हय़ात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. मध्यरात्रीपर्यंत लातूर शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. शहरातील काही भागात मंगळवारी सायंकाळी बंद पडलेला वीजपुरवठा बुधवारी सकाळपर्यंत पूर्ववत झाला नव्हता. जळकोट तालुक्यातील कोळनूर येथे िलबाच्या आकाराच्या गारा पडल्या.